नवी दिल्ली,दि.२६-:देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणात आता अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या प्राध्यापिका मनीषा हवालदार हिने सीबीआय चौकशीत मोठी कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. “एनटीएतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सूचनेवरूनच प्रश्नपत्रिका फोडली,” असे तिने तपास यंत्रणांना सांगितल्याने थेट परीक्षा घेणाऱ्या संस्थेवरच संशयाची सुई फिरली आहे.
नीट पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत ११ जणांना अटक करण्यात आली असून सीबीआयने तपास अधिक तीव्र केला आहे. पुण्यातील भौतिकशास्त्राच्या प्राध्यापिका मनीषा हवालदार यांना काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. सध्या त्या सीबीआय कोठडीत असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
चौकशीदरम्यान मनीषा हवालदारने धक्कादायक खुलासा करत, नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) च्या पॅनलमधीलच एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून प्रश्नपत्रिका बाहेर काढल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे आता या संपूर्ण रॅकेटचा सूत्रधार नेमका कोण, याचा शोध घेण्यासाठी सीबीआयची विशेष पथके सक्रिय झाली आहेत.
व्हॉट्सअॅपवर प्रश्नपत्रिका पाठवल्याची कबुली
तपासात असेही समोर आले आहे की, मनीषा हवालदार हिने परीक्षेपूर्वी अनेक विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र विषयाचे प्रश्न आणि उत्तरे उपलब्ध करून दिली होती. यासाठी मोठी आर्थिक देवाणघेवाण झाल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे.
हे प्रश्न तिने सहआरोपी मनीषा मांढरे हिला व्हॉट्सअॅपवर पाठवले होते. मात्र, तपासाचा सुगावा लागताच तिने सर्व चॅट्स डिलीट केल्याची कबुली दिली आहे. एवढेच नाही तर प्रश्नांच्या हस्तलिखित नोट्स जाळून टाकल्याचेही तिने मान्य केले.
सीबीआयच्या माहितीनुसार, मनीषा हवालदार हिने स्वतःच्या मोबाईलसोबतच पती संजय हवालदार यांच्या मोबाईलचाही वापर करून प्रश्नपत्रिका पाठवल्या होत्या. आता डिलीट केलेला डेटा पुन्हा मिळवण्यासाठी सायबर तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे.
“गॉड” नावाने सेव्ह केलेला नंबर तपासाच्या रडारवर
सीबीआयच्या छाप्यात मनीषा हवालदार यांच्या घरातून संशयास्पद प्रश्नपत्रिका, लॅपटॉप, मोबाईल फोन आणि एक लाखांहून अधिक रोकड जप्त करण्यात आली आहे. या डिजिटल उपकरणांमधून आणखी किती विद्यार्थ्यांना पेपर पुरवण्यात आला होता, याचा तपास सुरू आहे.
दरम्यान, तपासादरम्यान पती संजय हवालदार यांच्या मोबाईलमध्ये “God” नावाने सेव्ह असलेल्या नंबरशी झालेला संवाद तपास यंत्रणांच्या हाती लागला आहे. हा नंबर तेजस शहा नावाच्या विद्यार्थ्याचा असल्याची माहिती समोर आली आहे.
सीबीआयचा तपास वेगात
मनीषा हवालदार, मनीषा मांढरे आणि मनीषा वाघमारे या तिघींमध्ये व्हॉट्सअॅपवर पेपरफुटी संदर्भात अनेकदा चर्चा झाल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. पुरावे नष्ट करण्यासाठी संशयितांनी मोठ्या प्रमाणात डेटा डिलीट केला असला तरी सायबर फॉरेन्सिकच्या मदतीने तो पुन्हा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
या प्रकरणात एनटीएतील वरिष्ठ अधिकाऱ्याचा थेट सहभाग असल्याचा दावा समोर आल्याने देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. देशातील सर्वात मोठ्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या विश्वासार्हतेवरच आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज