पुणे,दि.२६- : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयाने आज रात्रीपासून (२६ मे) पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. हा आदेश २६ मे २०२६ ते ८ जून २०२६ पर्यंत लागू राहणार असून, या काळात सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे.
पेट्रोल-डिझेलच्या सतत वाढणाऱ्या दरांविरोधात विविध संघटना आक्रमक होत असल्याची माहिती गुप्तचर विभागाकडून मिळाल्यानंतर पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे. तसेच आगामी बकरी ईद आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, सामाजिक सलोखा अबाधित राहावा आणि शहरात शांतता टिकून राहावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
जमावबंदी दरम्यान मोर्चे, निदर्शने, घोषणाबाजी, सार्वजनिक सभा किंवा मोठ्या प्रमाणावर गर्दी जमवण्यावर निर्बंध असणार आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही पोलिसांनी दिला आहे. शहरातील संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून सीसीटीव्ही आणि ड्रोनद्वारे देखरेख वाढवण्यात येणार आहे.
दरम्यान, वाढत्या इंधन खर्चाचा परिणाम आता प्रशासकीय कामकाजावरही दिसून येत आहे. पुणे महानगरपालिकेने आपल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी ‘कार पुलिंग’ सक्तीचे केले असून, शक्य त्या बैठका ऑनलाईन घेण्याचे निर्देश दिले आहेत. अनावश्यक वाहन वापर टाळणे, इंधन बचत करणे आणि प्रशासनाचा खर्च कमी करणे हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले.
पुण्यातील या निर्णयामुळे नागरिकांमध्ये विविध प्रतिक्रिया उमटत असून, काहींनी प्रशासनाच्या सतर्कतेचे स्वागत केले आहे तर काहींनी वाढत्या महागाईमुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर संताप व्यक्त केला आहे.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज