फलटण शहर पोलिसांची मोठी कामगिरी; जिंती नाक्यावर धुमाकूळ घालणाऱ्या 'कोयता गँग'च्या म्होरक्याला मलटणमधून अटक!



फलटण (प्रतिनिधी): दि.22 मे 2026,

लोखंडी हत्याराचा धाक दाखवून सलून दुकान मालकाला मारहाण करत दरमहा १० हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला फलटण शहर पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली आहे. अभिजित अरुण जाधव (वय २२, रा. मलटण, ता. फलटण) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव असून, त्याच्या एका साथीदाराचेही नाव निष्पन्न झाले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्री. आशिष अशोक गाडगे यांचे फलटण येथील जिंती नाका येथे 'किंग युनिटेक्स पार्लर' नावाचे सलूनचे दुकान आहे. दि. १९ मे २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजण्याच्या सुमारास दुकानासमोर शाईन मोटरसायकलवरून दोन अनोळखी इसम आले. त्यापैकी पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेल्या एका इसमाने दुकानात घुसून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

त्याने कमरेतून सुमारे दोन फुटांचे धारदार लोखंडी हत्यार बाहेर काढले आणि फिर्यादींना धमकावत म्हटले, "मला अभि भाई म्हणतात, तू मला ओळखतोस का? तू दुकान चालू केले आहे, मला महिन्याला १०,००० रुपये हप्ता दे, अशी धमकी दिली." एवढेच नव्हे तर, पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने दुकानातील साहित्याची तोडफोड केली.

कामगारांना मारहाण आणि परिसरात दहशत!

यावेळी दुकानात काम करणारे कामगार मोहम्मद फरमान आणि अजिम अहमद यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, दुसऱ्या एका लाल रंगाचा शर्ट घातलेल्या इसमाने हातातील लोखंडी कड्याने त्यांना बेदम मारहाण करून जखमी केले. यानंतर आरोपींनी दुकानाबाहेर उभ्या असलेल्या कारची काच फोडून नुकसान केले आणि परिसरात दहशत निर्माण करून तेथून पळ काढला. याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.

पोलिसांनी असा लावला छडा;

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगवान केली. गोपनीय बातमीदार आणि परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजच्या मदतीने पोलिसांनी संशयित आरोपी अभिजित अरुण जाधव याला मलटण परिसरातून ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

अधिक चौकशीत हा गुन्हा त्याने त्याचा साथीदार अक्षय जाधव (रा. मलटण, फलटण) याच्यासोबत मिळून केल्याचे कबूल केले. पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल आणि लोखंडी हत्यार जप्त केले आहे. आरोपी अभिजित हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वीही फलटण शहर पोलीस ठाण्यात घरफोडी, जबरी चोरी, मारामारी आणि महिलांविरुद्धचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी!

अटक केलेल्या आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला दि. २३ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. नितीन शिंदे करत आहेत.

सदरची ही धडक कारवाई सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. श्री. निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक मा. डॉ. श्रीमती वैशाली कडुकर मॅडम, आणि फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. विशाल कृष्णा खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. अरविंद काळे, साहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. नितीन शिंदे, तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अंमलदार संतोष नाळे, जितेंद्र टिके, अतुल बडे आणि मुकेश घोरपडे यांनी पूर्ण केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या