पणदरे, दि.३१- : ग्रामपंचायत पणदरे येथे आज पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यांच्या समाजकारण, लोककल्याणकारी प्रशासन आणि स्त्रीशक्तीच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
मात्र, या कार्यक्रमात ग्रामपंचायतीचे अनेक सदस्य अनुपस्थित राहिल्याने गावात चर्चेला उधाण आले आहे. राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्यासारख्या महान लोकनायिकेच्या जयंती कार्यक्रमाकडे काही सदस्यांनी पाठ फिरवल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. त्यामुळे कार्यक्रमाला अपेक्षित लोकप्रतिनिधींची उपस्थिती नसल्याचे दिसून आले.
उपस्थित मान्यवरांनी अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याचा आदर्श घेऊन समाजहिताची कामे करण्याचे आवाहन केले. तसेच अशा ऐतिहासिक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांच्या जयंती कार्यक्रमांना लोकप्रतिनिधींनी प्राधान्याने उपस्थित राहणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाला ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते. मात्र ग्रामपंचायत सदस्यांच्या अनुपस्थितीमुळे या जयंती सोहळ्याची चर्चा गावभर रंगली असून लोकप्रतिनिधींच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज