माळेगाव (प्रतिनिधी),दि.३१-: अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेत, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर मुंबई पोलिस दलात निवड झालेल्या कुमारी श्रुती रामदास मोरे हिचा नुकताच सत्कार करण्यात आला. वडिलांचे छत्र लहानपणीच हरपल्यानंतर आईने संसाराची जबाबदारी सांभाळत मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. त्याच कष्टाचे फळ म्हणून श्रुतीने मुंबई पोलिस पद मिळवून कुटुंबासह परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे.
श्रुतीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल करिअर अकॅडमी, माळेगाव येथील शिक्षकवर्ग व विद्यार्थ्यांनी तिचे विशेष कौतुक केले. यावेळी अकॅडमीचे भोसले सर यांनी श्रुतीच्या चिकाटीचे आणि मेहनतीचे कौतुक करत इतर विद्यार्थ्यांनीही तिचा आदर्श घ्यावा, असे मत व्यक्त केले.
या सत्कार समारंभात पणदरे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य अरुण भिमराव मोरे, सोनकसवाडी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य तथा भाजप अनुसूचित जाती मोर्चा तालुकाध्यक्ष जनार्दन गायकवाड आणि वंचित बहुजन न्यूजचे मुख्य संपादक महेश गायकवाड यांनी श्रुतीचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. तसेच तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत तिच्या यशामागील आईच्या संघर्षालाही सलाम केला.
श्रुती मोरे हिच्या यशामुळे परिसरातील युवक-युवतींना स्पर्धा परीक्षा व शासकीय सेवेकडे प्रेरणा मिळाली असून, तिच्या या यशाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज