फलटण : प्रतिनिधी, [दि.31 मे 2026]
सातारा जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे साहेब यांनी जिल्ह्याचा पदभार स्वीकारताच आपल्या धडाकेबाज आणि डॅशिंग कामगिरीचा इंगा दाखवण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या कडक आदेशानुसार फलटण तालुका आणि शहरातील सर्व प्रकारच्या बेकायदेशीर व अवैध धंदेवाल्यांचे पार धाबे दणाणले आहेत.
पोलीस अधीक्षकांच्या आदेशाला अनुसरून फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विशाल खांबे साहेब हे तातडीने ॲक्शन मोडवर आले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण ग्रामीणचे पोलीस निरीक्षक श्री. राजकुमार भुजबळ साहेब आणि फलटण शहरचे पोलीस निरीक्षक श्री. अरविंद काळे साहेब यांनी संयुक्तपणे मोठी मोहीम राबवून अवैध धंदेवाल्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
सर्व अवैध धंदे पूर्णपणे बंद!
पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे फलटण शहर आणि तालुक्यासह ग्रामीण भागातील जसे की बरड, सांगवी, आणि साखरवाडी यांसारख्या प्रमुख ठिकाणी सुरू असलेले सर्व बेकायदेशीर धंदे पूर्णपणे भुईसपाट झाले आहेत. यामध्ये:
जुगार, चक्री, मटका, वेश्या व्यवसाय, हातभट्टीची दारू, गुटखा आणि अवैध दारू विक्री यांसारख्या सर्वच समाजघातक कृत्यांवर पोलिसांनी पूर्णपणे टाळे ठोकले आहे. पोलिसांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडाली आहे.
"सद्रक्षणाय खलनिग्रहणाय" (सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश) या महाराष्ट्र पोलिसांच्या ब्रीदवाक्याप्रमाणे फलटण शहर आणि ग्रामीण पोलिसांची सध्या कामगिरी सुरू आहे. तरी तालुक्याच्या कोणत्याही ठिकाणी अवैध धंदे सुरू असल्यास स्थानिक पोलिस प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन ही केले आहे..
नागरिकांमधून पोलिसांचे कौतुक!
दीर्घकाळानंतर फलटण परिसरात अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन झाल्याचे पाहायला मिळत असल्याने तालुक्यातील आणि शहरातील सामान्य नागरिकांच्या मनामध्ये पोलिसांविषयीचा आदर आणि विश्वास कमालीचा वाढला आहे. महिला वर्ग आणि सुजाण नागरिकांमधून या धाडसी कारवाईचे उत्स्फूर्त स्वागत होत असून, सर्वच क्षेत्रातून पोलीस प्रशासनावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज