श्रीराम सहकारी कारखान्याची विशेष सभा वादळी; 'श्री दत्त इंडिया' कडे धुरा, संजीवराजेंच्या 'रुद्र अवतारा'सह ठराव बहुमताने मंजूर;

 


फलटण (प्रतिनिधी):

येथील श्रीराम सहकारी साखर कारखान्याची विशेष सर्वसाधारण सभा काल (१८ मे) कारखाना स्थळावर प्रचंड वादळी वातावरणात पार पडली. मागील भागीदार 'जव्हार शेतकरी सहकारी साखर कारखाना' यांनी मुदतपूर्व करार रद्द केल्याने, आता आगामी १५ वर्षांसाठी कारखाना सहयोगी तत्त्वावर चालवण्यासाठी 'दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड' (साखरवाडी) यांच्या नावाचा ठराव सभासदांच्या बहुमताने मंजूर करण्यात आला. मात्र, या सभेत करारातील अटी आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अभूतपूर्व खडाजंगी पाहायला मिळाली. त्यातच नेहमी शांत असणारे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर थेट स्टेजवरून खाली उतरल्याने सभेतील राजकीय पारा कमालीचा वाढला होता.

जवाहर कारखान्याकडून करार रद्द; ८ कोटींची नुकसानभरपाई मिळणार!

सभेच्या सुरुवातीला कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी पार्श्वभूमी स्पष्ट केली. २००६ पासून कारखान्याची धुरा सांभाळणाऱ्या जव्हार कारखान्याने बदलती जागतिक बाजारपेठ, साखरेचे अस्थिर दर आणि वाढत्या तोट्यामुळे २६ फेब्रुवारी २०२६ रोजी कारखाना पुढे चालवण्यास असमर्थता दर्शवणारे पत्र दिले होते.

यावर विरोधकांनी आक्षेप घेतला की, ७ वर्षांचा 'लॉकिंग पिरियड' असताना जव्हार कारखाना मधेच कसा सोडून जाऊ शकतो? याला उत्तर देताना प्रशासनाने स्पष्ट केले की, करार मधेच मोडल्यामुळे जव्हार कारखान्याकडून ८ कोटी रुपयांची भरपाई वसूल केली जाईल आणि ती त्यांच्या देणे-घेण्यातून वजा केली जाईल. कारखान्याचे नेटवर्थ उणे १६ कोटी ४४ लाख रुपये असल्यामुळे बँकेने कर्ज नाकारले होते, त्यामुळे उच्च न्यायालयाच्या ५ मे २०२६ च्या आदेशानुसार ही विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात आली.

'श्री दत्त इंडिया' आणि 'शरयू'च्या प्रस्तावांची तुलना;

कारखान्याने मागवलेल्या 'एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट' (EOI) नुसार दोन कंपन्यांचे प्रस्ताव आले होते:

दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड: पहिल्या ५ वर्षांसाठी वार्षिक ५.५ कोटी, पुढील ५ वर्षांसाठी ६ कोटी, आणि शेवटच्या ५ वर्षांसाठी ६.५ कोटी रुपये भाडे देणार. तसेच जव्हार कारखान्याची देणी भागवण्यासाठी ३५ कोटी रुपये त्वरित उपलब्ध करून देणार. आगामी दीड वर्षात कारखान्याची क्षमता ५,००० वरून १०,००० मेट्रिक टन करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

शरयू कार्स: साधारण ४.५ ते ५ कोटी वार्षिक भाड्याचा प्रस्ताव होता, मात्र ' श्री दत्त इंडिया'चा प्रस्ताव अधिक फायदेशीर असल्याने हा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला.

सभेत हायव्होल्टेज नाट्य; श्रीमंत संजीवराजेंचा 'रुद्र अवतार'!

सभेत जेव्हा 'जव्हार' कारखान्याचा जुना करार आणि कथित नुकसानीचा मुद्दा उपस्थित झाला, तेव्हा विरोधक कमालीचे आक्रमक झाले. नगराध्यक्ष श्रीमंत समशेरसिंह नाईक निंबाळकर आणि ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. नरसिंह निकम यांनी व्यवस्थापनाला धारेवर धरत एकापाठोपाठ एक प्रश्न विचारण्यास सुरुवात केली.

ॲड. नरसिंह निकम हे मागील करारातील तांत्रिक मुद्यांचा हवाला देत प्रशासनाची कोंडी करण्याचा प्रयत्न करत होते. २०२२ च्या करारात मंत्री समितीने सुचवल्याप्रमाणे जव्हार कारखान्याकडून नफ्यातील २०० रुपये प्रति टन श्रीराम कारखान्याला का मिळाले नाहीत, असा सवाल करत विरोधकांनी ४४ कोटी रुपयांच्या नुकसानीचा आरोप केला.

विरोधकांचा हा गदारोळ आणि आरोपबाजी सुरू असतानाच, स्टेजवर उपस्थित असलेले श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा संयम सुटला. नेहमी शांत आणि संयमी नेतृत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संजीवराजेंचा एक वेगळाच 'रुद्र अवतार' यावेळी संपूर्ण फलटणकरांना पाहायला मिळाला. ॲड. निकम यांच्या प्रश्नांना आणि आरोपांना थेट भिडण्यासाठी श्रीमंत संजीवराजे यांनी थेट स्टेजवरून खाली उडी मारली आणि ते विरोधी सभासदांच्या दिशेने गेले. संजीवराजेंचा हा आक्रमक बाणा पाहून काही काळ सभेतील सर्वच जण अवाक झाले.

"विरोधकांकडून दिशाभूल"; नगराध्यक्षांना एकत्र बसण्याचे आवाहन!

माईक हातात घेत श्रीमंत संजीवराजे यांनी विरोधकांना थेट सुनावले की, "ॲड. निकम हे मागील करारातील जुने प्रश्न उकरून काढून केवळ सर्वसामान्य सभासदांची 'दिशाभूल' करत आहेत. आजची सभा कारखाना पुढे कसा चालवायचा यासाठी आहे."

थेट मैदानात उतरलेल्या संजीवराजेंनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर लगेचच संयमही दाखवला. समोर उपस्थित असलेले नगराध्यक्ष श्रीमंत समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे पाहत ते म्हणाले, "नगराध्यक्ष महोदय, तुम्ही विचारत असलेल्या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे आमच्याकडे तयार आहेत. आम्ही कोणतीही गोष्ट लपवत नाही आहोत. कारखाना वाचवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, त्यामुळे आपण शांततेत एकत्र बसून या सर्व शंकांवर बोलूया."

गदारोळातच ठराव मंजूर; राजकीय वर्तुळात चर्चा

चेअरमन आणि प्रशासनाने स्पष्ट केले की, विरोधकांचे आरोप चुकीचे असून नवीन करारात कोणतीही नवीन लायबिलिटी (कर्ज) श्रीराम कारखान्यावर येणार नाही. शेतकऱ्यांचे वेळेवर पेमेंट आणि कामगारांचे पगार होण्यासाठी कारखाना चालू राहणे गरजेचे असल्याचे सांगत सत्ताधारी गटाने बहुमताने दत्त इंडियाचा ठराव मंजूर केला आणि राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली.

श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि कारखान्यावरील आरोपांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी धारण केलेला हा आक्रमक अवतार आणि थेट स्टेजवरून मारलेली उडी सध्या फलटणच्या राजकीय वर्तुळात सर्वात मोठा चर्चेचा विषय ठरली आहे.

या सभेला श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सत्यजीतराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपकराव चव्हाण, यांसह संचालक बाळासाहेब शेंडे संचालक मंडळ आणि मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या