सातारा, दि. १५ प्रतिनिधी — देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्यातील सैनिक स्कूल मैदानावर आयोजित घरकुल वितरण सोहळ्यात राज्यातील जनतेसाठी मोठी घोषणा करत पुढील वर्षी तब्बल १५ लाख घरांचे वितरण करण्यात येणार असल्याचे सांगितले. प्रधानमंत्री आवास योजनेत महाराष्ट्राने विक्रमी कामगिरी करत एका वर्षात पाच लाख घरे पूर्ण करून लाभार्थ्यांना चाव्यांचे वितरण केले असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चव्हाण, खासदार उदयनराजे भोसले, पालकमंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, २०१६ ते २०२२ या कालावधीत राज्याला १२ लाख ९० हजार घरांचे उद्दिष्ट मिळाले होते. मात्र नव्याने अनेक गरजू कुटुंबे समोर आल्याने आणखी ३० लाख घरांची गरज निर्माण झाली आहे. केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असून पुढील दोन ते तीन वर्षांत मोठ्या प्रमाणावर घरकुलांचे वितरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकारकडून प्रत्येक घरकुलासाठी अतिरिक्त ५० हजार रुपयांची मदत देण्यात येत असून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घर मिळालेल्या लाभार्थ्यांना सौरऊर्जेसाठी अनुदान देऊन आयुष्यभर मोफत वीज उपलब्ध करून देण्याचाही निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
शेतकरी प्रश्नांवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत असून केंद्राच्या सहकार्याने त्यांना दिलासा देण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत. ऊस उत्पादक आणि साखर उद्योगाच्या समस्यांवरही लवकरच केंद्रीय स्तरावर बैठक घेण्यात येणार आहे.
राज्य सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सकारात्मक असून ३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करण्याची तयारी सुरू असल्याचे संकेत त्यांनी दिले. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम देण्याचाही निर्णय सरकार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महिलांच्या सक्षमीकरणावर भर देताना फडणवीस म्हणाले की, गेल्या दोन वर्षांत राज्यातील ५० लाख महिलांना ‘लखपती दीदी’ बनवण्यात यश आले असून हा आकडा एक कोटीपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी अण्णा भाऊ साठे नोंदयांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा उल्लेख करत त्यांच्या कार्याला अभिवादन केले. “हे सरकार सर्वसामान्य, शेतकरी आणि कामगारांचे सरकार आहे,” असे सांगत त्यांनी ऊर्जा बचतीचे आवाहन केले.
ग्रामविकास विभागाने विक्रमी वेळेत पाच लाख घरांचे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि विभागाच्या अधिकाऱ्यांचे तोंडभरून कौतुक केले. “घरकुल उद्दिष्टपूर्तीचे शिवधनुष्य त्यांनी यशस्वीपणे पेलले,” अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी गौरव केला.
केंद्रीय मंत्री शिवराजराजे सिंह चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक नागरिकाला पक्के घर मिळावे यासाठी देशभरात मोठे अभियान सुरू आहे. महाराष्ट्रातील प्रशासन मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत योजना पोहोचवत असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढील वर्षी १५ लाख घरांचे वितरण करण्यासाठी नव्याने अर्ज मागवले जाणार असून सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात पालकमंत्री शंभूराज देसाई आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी एकमेकांना पुष्पगुच्छ देत अनौपचारिक भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शंभुराज देसाई आणि शिवेंद्रसह राजे भोसले हे एकाच गाडीतून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा अनावरण कार्यक्रमाला रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.
बऱ्याच काळानंतर खासदार उदयनराजे भोसले जाहीर कार्यक्रमात सक्रियपणे सहभागी झाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यासपीठावर त्यांची आवर्जून भेट घेत हस्तांदोलन केले.
सातारा जिल्ह्यात भाजपचा आक्रमक ग्रामीण चेहरा म्हणून ओळख असलेले जयकुमार गोरे यांनी या कार्यक्रमाचे नेटके नियोजन केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. घरकुल योजनांच्या माध्यमातून भाजपची ग्रामीण भागातील पकड अधिक मजबूत करण्यात ते यशस्वी ठरत असल्याची चर्चा कार्यक्रमानंतर सुरू होती.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज