वाई [प्रतिनिधी]: दि.15 मे 2026,
भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक आबासाहेब वीर यांच्या १२० व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेला भव्य पुरस्कार वितरण सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीनजी गडकरी यांना या वर्षाचा 'आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार' प्रदान करून गौरविण्यात आले.
रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते सत्कार!
महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती मा. आ. श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या शुभहस्ते नितीन गडकरी यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. साखर उद्योगातील क्रांती आणि रस्ते विकासातील गडकरींच्या अतुलनीय योगदानाबद्दल यावेळी मान्यवरांनी त्यांचे विशेष कौतुक केले.
रामराजे नाईक-निंबाळकर आणि नितीन गडकरी यांच्यातील स्नेह अन् संस्कारांचे दर्शन;
वाई येथील सोहळ्यात एक अत्यंत हृदयस्पर्शी प्रसंग पाहायला मिळाला. महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते जेव्हा केंद्रीय मंत्री ना. नितीनजी गडकरी यांचा सत्कार करण्यात आला, तेव्हा दोन दिग्गज नेत्यांमधील आदरयुक्त स्नेह सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.
श्रीमंत रामराजेंनी अत्यंत आदरपूर्वक गडकरी साहेबांचा सन्मान केला, तर त्याच क्षणी 'विकासपुरुष' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नितीन गडकरी यांनीही आपली सहजता आणि नम्रता जपली. पुरस्कार स्वीकारताना गडकरी साहेबांनी अत्यंत नम्रपणे श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांना वाकून नमस्कार केला. राजकारणातील ज्येष्ठता आणि परस्परांबद्दलचा आदर दर्शवणारा हा क्षण उपस्थित जनसमुदायासाठी संस्कारांचे उत्तम उदाहरण ठरला. या प्रसंगातून दोन्ही नेत्यांची उंची आणि महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे दर्शन घडले.
राजकीय धुरंदरांची उपस्थिती:
या सोहळ्याचे अध्यक्षस्थान आमदार मकरंद जाधव-पाटील यांनी भूषवले. याप्रसंगी मंचावर मंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, माजी मंत्री बाळासाहेब पाटील आणि खासदार नितीन जाधव-पाटील यांसह सातारा जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कारखाना परिवारात उत्साह!
कॉलनी ग्राउंड, किसनवीरनगर येथे झालेल्या या सोहळ्यासाठी सातारा जिल्हा आणि वाई तालुक्यातील हजारो नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे आणि सर्व संचालक मंडळाने विशेष परिश्रम घेतले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणातून आबासाहेब वीर यांच्या कार्याला उजाळा देत साखर उद्योगासमोरील भविष्यातील आव्हाने आणि संधींवर प्रकाश टाकला.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज