फलटण (प्रतिनिधी): दिनांक 30 मे 2026,
फलटण येथील खुंटे रोड, दत्त नगर, सस्तेवाडी हद्दीतील सार्वजनिक रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमण तात्काळ हटवण्यात यावे, या मागणीसाठी दत्त नगर आणि सस्तेवाडी परिसरातील समस्त ग्रामस्थ व नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या (PWD) उपविभागीय अभियंत्यांना निवेदन दिले आहे.
नागरिकांनी दिलेल्या निवेदनानुसार, सस्तेवाडी हद्दीतील दत्त नगर येथील PWD खात्याच्या जागेमध्ये आणि 'खुंटे रोड' लगत असलेल्या सार्वजनिक रस्त्यावर श्री. महादेव जाधव (रा. खुंटे रोड, दत्त नगर, सस्तेवाडी) यांनी बेकायदेशीरपणे किराणा मालाच्या दुकानाचे पत्र्याचे शेड बांधले आहे. या अतिक्रमणामुळे मुख्य रस्त्याची रुंदी कमालीची कमी झाली आहे.
अपघाताची भीती आणि नागरिकांना मनस्ताप;
या मुख्य रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे परिसरात सतत वाहतूक कोंडी होत असून, अपघाताची तीव्र शक्यता निर्माण झाली आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे, एखाद्या आणीबाणीच्या प्रसंगी या रस्त्यावरून रुग्णवाहिका किंवा अग्निशामक दलाची गाडी जाण्यासाठीही मोठा अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे दत्त नगर परिसरातील नागरिक, पादचारी आणि वाहनचालक यांना ये-जा करताना प्रचंड मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.
ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या:सार्वजनिक रस्त्यावरील हे अतिक्रमण पूर्णपणे बेकायदेशीर असून प्रशासनाने या समस्येची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी विनंती करत नागरिकांनी खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत:
१. संबंधित जागेची सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि स्थानिक प्रशासनामार्फत तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून रीतसर पंचनामा करण्यात यावा.
२. सार्वजनिक रस्त्यावरील हे बेकायदेशीर पत्र्याचे शेड तात्काळ निष्कासित (हटवण्यात) करण्यात यावे.
३. भविष्यात या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होणार नाही, याची प्रशासनाने योग्य ती दक्षता घ्यावी.
या निवेदनासोबत दत्त नगर परिसरातील समस्त नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आणि अतिक्रमित जागेचे फोटो जोडण्यात आले आहेत. प्रशासनाने यावर तात्काळ कारवाई करावी, अशी आग्रही मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.


0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज