फलटणमध्ये ‘गांजा रॅकेट’वर पोलिसांचा घणाघात; विक्रीसाठी आलेल्या दोघांना रंगेहात पकडले, २ लाखांचा मुद्देमाल जप्त

धुळदेव परिसरात पोलिसांचा सापळा; ४ किलोहून अधिक गांजासह दोघे जेरबंद, अंमली पदार्थांच्या साखळीचा तपास सुरू


फलटण | प्रतिनिधी

दिनांक ३०/०५/२०२६

सातारा जिल्ह्यात अवैध अंमली पदार्थांच्या व्यापाराविरोधात पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली असून फलटणमध्ये गांजाविक्रीसाठी आलेल्या दोन संशयितांना रंगेहात पकडण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा सातारा आणि फलटण शहर पोलिसांनी संयुक्तपणे राबविलेल्या या कारवाईत ४ किलो ६९ ग्रॅम गांजा, मोटारसायकल आणि दोन मोबाईल फोन असा एकूण २ लाख १ हजार ७२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


जिल्ह्यात वाढत्या अंमली पदार्थांच्या गैरव्यवहाराला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली.


मिळालेल्या माहितीनुसार, दोन इसम बजाज प्लॅटिना (एमएच १२ एचएक्स २६४९) या दुचाकीवरून धुळदेव (ता. फलटण) येथील रावरामोशी पुलाजवळ गांजा विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीची खातरजमा करून स्थानिक गुन्हे शाखा आणि फलटण शहर पोलिसांनी संयुक्त सापळा रचला.


संशयित घटनास्थळी पोहोचताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील पिशवीची तपासणी केली असता त्यामध्ये ४ किलो ६९ ग्रॅम वजनाचा गांजासदृश अंमली पदार्थ आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी गांजा, दुचाकी आणि मोबाईल फोन जप्त करत आरोपींना अटक केली.


अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अजित राजेंद्र कस्तुरे (वय ३१, रा. माळखांबी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) आणि आदित्य रामचंद्र आतार (वय २५, रा. श्रीपूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) अशी आहेत. दोघांविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणामागे आणखी कोणाचे जाळे कार्यरत आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.


या कारवाईत पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, फलटण शहरचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मिठू जगदाळे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा व फलटण शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या