बुलढाणा, प्रतिनिधी,दि.३०- : रसुलपूर शिवारात घडलेल्या कथित हत्याकांड प्रकरणात धक्कादायक वळण आले आहे. जवळपास महिनाभरापूर्वी मृत समजली गेलेली शिवानी अचानक जिवंत परतल्याने संपूर्ण प्रकरणावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे शिवानीच्या हत्येप्रकरणी तिच्या वडिलांनी आणि भावाने पोलिसांसमोर कबुली दिल्याची माहिती समोर आली होती. मात्र शिवानी जिवंत आढळल्याने तपास यंत्रणांची मोठी गोची झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २६ एप्रिल रोजी रसुलपूर शिवारात एका महिलेचा धडावेगळा मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाची ओळख शिवानी म्हणून करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत शिवानीच्या वडिलांना आणि भावाला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी हत्येची कबुली दिल्याचा दावा करण्यात आला होता.
मात्र या प्रकरणाला अनपेक्षित वळण मिळाले, जेव्हा शिवानी स्वतः जिवंत अवस्थेत समोर आली. त्यामुळे २६ एप्रिलला सापडलेला धडावेगळा मृतदेह नेमका कोणाचा होता? असा गंभीर प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
या घटनेमुळे पोलिसांच्या तपास पद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मृतदेहाची ओळख कशाच्या आधारे पटविण्यात आली? डीएनए चाचणी करण्यात आली होती का? कबुलीजबाबाच्या आधारे तपासाची दिशा ठरविण्यात आली का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आता शोधावी लागणार आहेत.
दरम्यान, शिवानी नेमकी महिनाभर कुठे होती, ती अचानक कशी समोर आली आणि या संपूर्ण प्रकरणामागील सत्य काय आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी नव्याने तपास सुरू केल्याची माहिती मिळत आहे.
या धक्कादायक घडामोडीमुळे बुलढाणा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, राज्यभरात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. आता सर्वांचे लक्ष पोलिसांच्या पुढील तपासाकडे लागले आहे.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज