पणदरेत दहा वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू पोहता येत नसल्यामुळे नीरा डाव्या कालव्यातील घटना

 


पणदरे , प्रतिनिधी दि.१६-: बारामती तालुक्यातील पाणदरे येथे मामाच्या घरी आलेल्या दहा वर्षांच्या मुलाचा नीरा डाव्या कालव्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत मुलाचे नाव अजहर सरफराज आतार (वय १०, रा. सातारा) असे आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, अजहर हा विवाह समारंभानिमित्त मामाच्या घरी पाणदरे येथे आला होता. गुरुवारी दुपारच्या सुमारास तो मामाच्या मुलांसोबत नीरा डाव्या कालव्याजवळ गेला होता. त्यावेळी पाण्यात उतरताना त्याचा तोल गेला आणि तो खोल पाण्यात बुडाला. अजहरला पोहता येत नसल्याने तो पाण्याबाहेर येऊ शकला नाही.


घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केले. माळेगाव पोलिस ठाण्याचे अधिकारी, महसूल विभाग, पाटबंधारे विभाग तसेच बारामती नगर परिषद बचाव पथकाने रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबवली. अखेर शुक्रवारी सकाळी रेस्क्यू टीमने कालव्यातून मुलाचा मृतदेह बाहेर काढला.


या घटनेमुळे अजहरच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. अजहर हा अत्यंत हुशार विद्यार्थी असून चौथीच्या परीक्षेत त्याने चांगले गुण मिळवले होते, अशी माहिती नातेवाईकांनी दिली.


दरम्यान, नीरा डावा कालवा पूर्ण क्षमतेने वाहत असल्याने नागरिकांनी आणि विशेषतः लहान मुलांनी पाण्याजवळ जाताना काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या