राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात मंगलदास निकाळजे यांचा जाहीर पक्षप्रवेश

बारामती,दि.२६- : सामाजिक आणि युवकांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे युवा कार्यकर्ते मंगलदास निकाळजे यांनी आज आपल्या सहकाऱ्यांसह सुरेंद्र पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( शरद पवार) मध्ये अधिकृत पक्षप्रवेश केला.


यावेळी बोलताना मंगलदास निकाळजे यांनी सांगितले की, शरद पवार यांची पुरोगामी, धर्मनिरपेक्ष आणि शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचारसरणी नेहमीच प्रेरणादायी राहिली आहे. सर्वसामान्य जनतेप्रती असलेली बांधिलकी आणि सामाजिक न्यायासाठीची भूमिका यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


“गेल्या अनेक वर्षांपासून युवकांचे प्रश्न, शिक्षण, रोजगार, सामाजिक न्याय आणि संविधानिक मूल्यांसाठी संघर्ष करत आलो आहे. आता हीच लढाई अधिक ताकदीने आणि संघटित पद्धतीने पुढे नेण्यासाठी हा राजकीय निर्णय घेतला आहे,” असेही त्यांनी नमूद केले.


बारामतीसह परिसरातील युवक, शेतकरी, कामगार, बहुजन समाज आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कासाठी संघर्ष कायम सुरू राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.


तसेच आजपर्यंत साथ देणाऱ्या मित्र, सहकारी आणि जनतेचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले. आगामी काळात पक्ष संघटना अधिक मजबूत करून जनतेचा प्रभावी आवाज बनण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करणार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या