पुणे,दि.२६- : पुणे शहरातील कुप्रसिद्ध बुधवार पेठ परिसरात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत वेश्याव्यवसायाचा भांडाफोड केला आहे. रविवारी रात्री करण्यात आलेल्या धाडीत 6 बांगलादेशी महिलांना अटक करण्यात आली असून, त्या बेकायदेशीररित्या भारतात राहत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पुणे पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार शहरभर कोंबिंग ऑपरेशन सुरू असताना बुधवार पेठेतील सागर बिल्डिंगवर संयुक्त पोलिस पथकाने छापा टाकला. पुणे शहर पोलीस यांच्या या कारवाईत फरासखाना आणि खडक पोलीस ठाण्याच्या पथकाने सहभाग घेतला होता.
परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावल यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही धाड टाकण्यात आली. तपासादरम्यान पकडण्यात आलेल्या सर्व महिलांनी बेकायदेशीर मार्गाने भारतात प्रवेश केल्याचे समोर आले आहे.
प्राथमिक चौकशीत महिलांनी पोलिसांना महत्त्वाची माहिती दिली आहे. ब्युटी पार्लर, शिवणकाम आणि घरकामाच्या नोकऱ्यांचे आमिष दाखवून त्यांना भारतात आणण्यात आले. मात्र पुण्यात आणल्यानंतर त्यांना जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे.
या महिलांना भारतात कोणी आणले, सीमा कशी ओलांडली आणि बनावट कागदपत्रे कुठून मिळाली याचा आता पुणे पोलीस सखोल तपास करत आहेत. गेल्या 11 महिन्यांत पुणे शहरातील विविध भागांतून 103 बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांविरोधात कारवाई करण्यात आली असून, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांना मायदेशी पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या प्रकरणी पुढील तपास सुरू असून मानवी तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज