बारामती,दि.२५-:पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. खाजगी सावकारांच्या सततच्या पैशांच्या तगाद्याला, मानसिक छळाला आणि धमक्यांना कंटाळून पारवडी येथील ४० वर्षीय युवा शेतकरी धनेश गुंडीबा गोसावी यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी (२४ मे २०२६) त्यांनी आपल्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेत जीवन संपवले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.
मृत्यूपूर्वी धनेश गोसावी यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत सावकारांकडून होत असलेल्या आर्थिक आणि मानसिक छळाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यांच्या पत्नी रुपाली धनेश गोसावी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बारामती तालुका पोलीस स्टेशन
येथे पाच जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि बेकायदेशीर सावकारी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात सोनू उर्फ लखन यादव डावरे, जयश्री लखन यादव डावरे (रा. साठेनगर, इंदापूर) तसेच सतीश शहाजी लांडगे, मारुती हरीदास लांडगे आणि प्रितम उर्फ कावा लांडगे (रा. पारवडी) यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धनेश गोसावी यांनी ३० डिसेंबर २०२४ रोजी मित्रांच्या ओळखीने इंदापूर येथील सावकाराकडून १ लाख रुपये घेतले होते. मात्र या रकमेसोबत प्रचंड व्याज आकारण्यात आले. २२ एप्रिल २०२५ रोजी त्यांनी तब्बल १ लाख ७० हजार रुपये परत केले. त्यानंतरही सावकारांनी दंड आणि व्याजाच्या नावाखाली पैशांची मागणी सुरूच ठेवली.
यानंतर २६ जून २०२५ रोजी आणखी २ लाख रुपये आणि ३० नोव्हेंबर २०२५ रोजी पुन्हा १ लाख रुपये देण्यात आले. म्हणजे केवळ १ लाख रुपयांच्या बदल्यात गोसावी कुटुंबाने जवळपास पावणेपाच लाख रुपये सावकारांना दिले होते. तरीदेखील आरोपींची पैशांची मागणी थांबली नाही.
फिर्यादीनुसार, १२ मे २०२६ रोजी आरोपींनी थेट गोसावी यांच्या घरी जाऊन आणखी दीड लाख रुपयांची मागणी केली. यावेळी रुपाली गोसावी यांच्या कानातील ५ ग्रॅम सोन्याचे टॉप्स जबरदस्तीने काढून घेतल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. “पैसे दे, नाहीतर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही,” अशी धमकी आरोपींनी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या सततच्या दहशतीमुळे धनेश गोसावी प्रचंड मानसिक तणावाखाली होते. रविवारी दुपारी ते घरी आले होते, मात्र केवळ पाणी पिऊन पुन्हा शेतात निघून गेले. पत्नीने जेवणासाठी फोन केला असता त्यांनी पोट दुखत असल्याचे सांगून फोन कट केला. काही वेळाने पुतण्या गौरव याने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने शेतात जाऊन पाहिले असता धनेश यांनी गळफास घेतल्याचे उघड झाले.
या घटनेनंतर बारामती तालुक्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, बेकायदेशीर सावकारी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे. ग्रामीण भागात वाढत चाललेल्या खासगी सावकारीच्या विळख्यात अनेक शेतकरी आणि कष्टकरी अडकत असल्याची चिंताजनक बाब पुन्हा एकदा समोर आली आहे.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज