“एमएसईबीचा मनमानी कारभार; बारामती ग्रामीण भाग अंधारात, नागरिक हैराण !”


पणदरे, दि.२५ : बारामती तालुक्यातील सोनकसवाडी, ढाकळे, मुढाळे आणि जळकेवाडी परिसरात सततच्या विजेच्या लपंडावामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. प्रचंड उष्णतेच्या काळात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे ग्रामस्थांना अक्षरशः जीवघेणा त्रास सहन करावा लागत असल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सकाळी सुरू होणारा तीन फेज वीजपुरवठा दुपारी सुमारे ३ वाजता खंडित होतो. त्यानंतर संध्याकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत सिंगल फेजवर लोडशेडिंग सुरू असते. एवढ्यावरच न थांबता रात्री ११.३० च्या सुमारास पुन्हा वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांच्या झोपेचेही खोबरे झाले आहे.

उष्णतेमुळे घरात थांबणे कठीण झाले असून रात्री विजेअभावी मच्छरांचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना याचा सर्वाधिक फटका बसत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. वारंवार होणाऱ्या वीज खंडित प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांनी महावितरणच्या मनमानी कारभारावर संताप व्यक्त करत तातडीने सुरळीत व अखंडित वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे. तसेच राज्याच्या उपमुख्यमंत्री यांनी या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन संबंधित विभागाकडून माहिती घ्यावी आणि ग्रामीण भागातील वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी हस्तक्षेप करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या