हॉटेल ग्रामपंचायतच्या मालकीण रोहिणी पाराध्येची आत्महत्या; ब्रह्मपुरीतील घटनेने खळबळ

 



मंगळवेढा,दि.२७- : तालुक्यातील ब्रह्मपुरी येथील “हॉटेल ग्रामपंचायत”च्या मालकीण रोहिणी निलेश पाराध्ये (वय २५) यांनी अज्ञात कारणावरून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून सोशल मीडियावरही हळहळ व्यक्त केली जात आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, काल दुपारी साडेदोनच्या सुमारास “हॉटेल ग्रामपंचायत”च्या स्वयंपाकघरातील पत्र्याच्या लोखंडी अंगलाला दोरीच्या सहाय्याने रोहिणी पाराध्ये यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.


या प्रकरणी पती निलेश पाराध्ये यांनी पोलिसांत खबर दिली असून आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


रोहिणी पाराध्ये आणि त्यांचे पती निलेश पाराध्ये हे सोशल मीडियावर विविध सामाजिक विषयांवरील व्हिडिओ तसेच खाद्यपदार्थांवरील रील्समुळे लोकप्रिय झाले होते. त्यांच्या लोकप्रियतेच्या जोरावर त्यांनी रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील ब्रह्मपुरी येथे “हॉटेल ग्रामपंचायत” हा व्यवसाय उभा केला होता. अल्पावधीतच या हॉटेलला मोठी ओळख मिळाली होती.


व्यवसायात स्थिरावत असताना आणि नव्या शाखेची तयारी सुरू असतानाच रोहिणी यांनी टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अनेकांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहत कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या