अनिल वीर
सातारा,दि.१३-:नांदेड जिल्ह्यातील माष्टी येथे प्रथमच भीम जयंती साजरी करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर बौद्ध वस्तीवर जातीयवादी प्रवृत्तींकडून हल्ला करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर पीडित बौद्ध समाजावरच क्रॉस केस व गंभीर गुन्हे दाखल करण्यात आल्याने आंबेडकरी चळवळ आक्रमक झाली असून, न्याय न मिळाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते सुरेश दादा गायकवाड यांनी माष्टी येथील बौद्ध समाज व पीडित कुटुंबाची भेट घेत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी पीडितांनी गावात सामाजिक बहिष्कार टाकण्यात आल्याचा आरोप केला. गावातील लोक पिण्याचे पाणी देत नाहीत, पिठाची गिरणीवर धान्य दळून दिले जात नाही, दुकानदार साहित्य देत नाहीत, रेशन बंद करण्यात आले असून गावातून ये-जा करणाऱ्या ऑटोमध्येही बसू दिले जात नसल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकरणी सुरेश दादा गायकवाड यांनी धर्माबाद येथील तहसीलदार स्वामी मॅडम यांची भेट घेत प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली. “गावात बहिष्कार टाकून लोकांना पाण्यासारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवले जात आहे. प्रशासन आरोपींनाच पाठीशी घालत आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी तहसीलदारांकडे कोणतेही ठोस उत्तर नसल्याचा दावा करण्यात आला.
त्यानंतर कुंडलवाडी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांची भेट घेत पीडितांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांबाबत जाब विचारण्यात आला. “ज्या समाजावर अन्याय झाला, त्याच समाजावर क्रॉस केस कोणाच्या दबावाखाली दाखल करण्यात आली? आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत आहे. बौद्ध समाजावरील गुन्हे तात्काळ मागे घ्या, अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन उभे करू,” असा इशारा सुरेश दादा गायकवाड यांनी दिला.
यावेळी आंबेडकरवादी लोक मंचचे नंदकुमार बनसोडे, भास्कर भेदेकर, जे. पी. मिसाळे, जयपाल वाघमारे तसेच स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज