बारामती,दि.१३-:बारामतीमध्ये कायदा व सुव्यवस्थेची घडी विस्कटत चालल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित करत आमदार रोहित पवार यांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिपसिंह गील यांची भेट घेत निवेदन दिले. वाढती गुन्हेगारी, विद्यार्थीनींच्या सुरक्षेचा प्रश्न तसेच तरुण पिढीत वाढत चाललेले ड्रग्ज सेवनाचे प्रमाण ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी म्हटले.
बारामती परिसरात काही स्थानिक नेत्यांकडून विविध नावांनी पार्ट्यांचे आयोजन केले जात असून त्या ठिकाणी अमली पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. त्यामुळे अनेक तरुण व्यसनांच्या विळख्यात अडकत असून समाजात गंभीर परिणाम दिसून येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
याशिवाय व्यापाऱ्यांना धमकावणे, खंडणी उकळणे यांसारख्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचेही त्यांनी पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. या संपूर्ण प्रकरणात तातडीने कठोर कारवाई करून गुन्हेगारीला पायबंद घालावा, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी पोलीस अधीक्षक संदिपसिंह गील यांनी परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. पुढील काही दिवसांत सकारात्मक बदल दिसून येतील, अशी अपेक्षा रोहित पवार यांनी व्यक्त केली.
दरम्यान, नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीविरोधात पंधरा दिवसांत आरोपपत्र दाखल करण्याचे आश्वासन पोलिसांनी यापूर्वी दिले होते. त्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. पुढील दोन दिवसांत आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती गील यांनी दिली.
या भेटीदरम्यान बारामतीतील महाविकास आघाडीतील विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.


0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज