बारामती /माळेगाव,दि.१४- :प्रतिकूल परिस्थिती आणि दिव्यांगत्वावर मात करत बारामती येथील नियुक्ती अमोल खरात हिने दहावीच्या परीक्षेत ८९.२० टक्के गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या जिद्दीच्या प्रवासाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
लहानपणी एका लग्न समारंभात डीजेच्या कर्कश आवाजामुळे नियुक्तीच्या दोन्ही कानांची श्रवणशक्ती कमी झाली. त्यानंतर कुटुंबीयांनी अनेक मोठ्या रुग्णालयांत उपचार केले, विविध तपासण्या केल्या, कानाचे मशीनदेखील वापरून पाहिले; मात्र अपेक्षित परिणाम झाला नाही.
अशा कठीण परिस्थितीतही नियुक्तीने शिक्षणाची जिद्द सोडली नाही. तिने बारामती येथील विद्या प्रतिष्ठान संचलित विनोद कुमार गुजर बाल विकास मंदिर इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेतले. ऐकू येत नसतानाही शिक्षकांच्या ओठांच्या हालचाली ओळखून शिकण्याची कला तिने आत्मसात केली.
नुकत्याच लागलेल्या दहावीच्या निकालात नियुक्तीने ८९.२० टक्के गुण मिळवत यश मिळवले. विशेष म्हणजे तिने कोणतीही खासगी शिकवणी न लावता स्वअध्ययनाच्या जोरावर हे यश संपादन केले. अभ्यासासाठी आई स्वाती खरात, मोठी बहीण श्रृती तसेच वडील अमोल खरात यांनी तिला मोलाची साथ दिली.
या यशाबद्दल प्राचार्य आशिष घोष आणि वर्गशिक्षिका खोडवे यांनी नियुक्तीचे अभिनंदन केले. “माझे आदर्श भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. उच्च शिक्षण घेऊन मोठी अधिकारी बनायचे असून माझी परिस्थिती बदलायची आहे,” अशी भावना नियुक्ती खरात हिने व्यक्त केली.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज