फलटण (प्रतिनिधी): दि.21 मे 2026,
खेळ जगतातून फलटण तालुक्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि ऐतिहासिक बातमी समोर आली आहे. पहिल्या दक्षिण आशियाई सॉफ्ट हॉकी स्पर्धेसाठी (First South Asian Soft Hockey Championship) भारतीय संघाच्या कर्णधारपदी (कॅप्टन) फलटणच्या मातीतील सुपुत्र लखन नंदकुमार मोरे यांची अधिकृत निवड झाली आहे. या अभूतपूर्व यशाबद्दल महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री. महादेवजी जानकर साहेब यांनी आज लखन मोरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या पालकांची भेट घेतली व मोरे कुटुंबाला विशेष शुभेच्छा दिल्या.
देशाची मान अभिमानाने उंच करणारी कामगिरी: महादेव जानकर
या भेटीदरम्यान माजी मंत्री महादेव जानकर साहेब यांनी लखन मोरे याच्या यशाचे तोंडभरून कौतुक केले. ते म्हणाले, "ग्रामीण भागातील एका तरुणाने आपल्या जिद्दीच्या आणि कष्टाच्या जोरावर थेट भारतीय संघाचे नेतृत्व मिळवणे, ही संपूर्ण देशासाठी अत्यंत अभिमानाची आणि गर्वाने मान उंच करणारी गोष्ट आहे. लखनने केवळ फलटणचेच नव्हे, तर देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवले आहे."
'आई-वडिलांनी हिरा जन्माला घातला'!
या ऐतिहासिक क्षणी महादेव जानकर साहेब यांनी लखनचे वडील श्री. नंदकुमार मोरे आणि आई सौ. शैला नंदकुमार मोरे यांचाही विशेष सन्मान केला. भावूक आणि कौतुकाच्या सुरात जानकर साहेब म्हणाले की, "मोरे दांपत्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या मुलाला क्रीडा क्षेत्रात उत्तम संस्कार आणि पाठबळ दिले. या माता-पित्याने देशासाठी एक 'हिरा' जन्माला घातला आहे, ज्याच्या चमकेने आज संपूर्ण भारताचे नाव जगात रोशनाईने उजळणार आहे."
सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव!
लखन मोरे याची भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड झाल्याचे वृत्त समजताच फलटणसह संपूर्ण सातारा जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करत असताना तो देशासाठी सुवर्णपदक नक्कीच घेऊन येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर, क्रीडाप्रेमी आणि ग्रामस्थांनी मोरे कुटुंबाचे अभिनंदन करून लखनला पुढील वाटचालीस व स्पर्धेसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज