धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या मेळाव्यात सरकारविरोधात तीव्र भूमिका
मुरबाड, प्रतिनिधी,दि.२२-:ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात प्रस्तावित असलेल्या काळू धरण प्रकल्पाविरोधातील संघर्ष आता अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. मुंबई, ठाणे व इतर महानगरांच्या पाणीपुरवठ्यासाठी उभारण्यात येणाऱ्या या धरणामुळे बाधित होणाऱ्या शेतकरी आणि ग्रामस्थांच्या प्रश्नांना आता स्थानिक लोकप्रतिनिधींचेही पाठबळ मिळू लागले आहे.
मौजे तळेगाव येथे काळू धरण बाधित शेतकरी यांच्या वतीने आयोजित “शेतकरी मेळावा” आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या मेळाव्यास काळू धरण बाधित परिसरातील विविध गावांतील शेतकरी, ग्रामस्थ तसेच परिसरातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार कथोरे यांनी सरकारच्या अन्यायकारक धोरणांविरोधात धरणग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले. “काळू धरण परिसरातील प्रत्येक शेतकरी व रहिवाश्यांच्या संघर्षात आम्ही सहभागी राहू. भविष्यातील लढ्यातही मार्गदर्शन व सहकार्य कायम राहील,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच बारवी धरण प्रकल्पातील पुनर्वसन हे राज्यासह देशासाठी आदर्श ठरल्याचेही त्यांनी नमूद केले.
मेळाव्यात ठाणे जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी काळू धरणाला विरोध करण्याचा एकमुखी निर्धार व्यक्त केला. “हा संघर्ष पुढील पिढ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक आहे,” असे ते म्हणाले. जनभावना लक्षात घेऊन विधायक कार्याला पाठिंबा देण्याची भूमिकाही त्यांनी मांडली.
या कार्यक्रमास भाजप तालुकाध्यक्ष दीपक पवार, ज्येष्ठ नेते सुहास मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य नंदा उघडा, माजी पंचायत समिती सदस्य अनिल घरत, आदिवासी प्रतिनिधी राजेश शिंगवा तसेच शाई धरण विरोधी संघर्ष समितीचे उमेश वारघडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, काळू नदी धरणग्रस्त सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता समितीचे अध्यक्ष संभाजी फनाडे यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत केले. तर ज्येष्ठ शेतकरी नेते हरिभाऊ राऊत यांनी “धरण हे आमच्यावर ओढवलेले मरण आहे” असे सांगत आंदोलनात गैरसमज पसरवणाऱ्यांना शेतकरीच उत्तर देतील, असा इशारा दिला.
काळू धरण विरोधी संघर्ष समितीचे सह-अध्यक्ष पोपटराव देशमुख यांनीही संघर्ष समितीत फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना इशारा देत, “धरणग्रस्तांमध्ये दुही माजवण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही,” असे ठामपणे सांगितले.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज