पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी; विविध संघटनांकडून अभिवादन


अनिल वीर

सातारा ,दि.३१-: लोककल्याणकारी कार्य, न्यायप्रिय राज्यकारभार, दानशूरता आणि समाजहितासाठी केलेल्या अतुलनीय योगदानामुळे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना इतिहासात विशेष स्थान प्राप्त झाले आहे. त्यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त सातारा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ विविध सामाजिक संघटनांच्या वतीने अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.


यावेळी संबोधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रमेश इंजे, बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर आदींनी मनोगत व्यक्त करताना अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांनी आयुष्यभर जनतेच्या कल्याणासाठी काम करत आदर्श शासनव्यवस्था उभी केली. त्यांच्या कारकिर्दीत अनेक मंदिरे, घाट, धर्मशाळा, अन्नछत्रे, विहिरी आणि बारवांची उभारणी करण्यात आली. परकीय आक्रमणांमुळे उद्ध्वस्त झालेल्या मंदिरांचा आणि तीर्थक्षेत्रांचा त्यांनी जीर्णोद्धार करून सांस्कृतिक वारसा जपला.


दुष्काळी काळात प्रजेला अन्न व निवारा उपलब्ध करून देत त्यांनी माणुसकीचा आदर्श घालून दिला. तसेच महिलांना मालमत्तेचे अधिकार मिळवून देणे, समाजहितासाठी कठोर आणि न्याय्य कायदे करणे, पारदर्शक प्रशासन राबविणे यामुळे त्या प्रजाहितदक्ष राज्यकर्त्या म्हणून ओळखल्या गेल्या.


त्यांच्या या महान आणि पवित्र कार्यामुळे प्रजेने तसेच इतिहासाने त्यांना ‘पुण्यश्लोक’ आणि ‘लोकमाता’ या सन्माननीय पदव्या बहाल केल्या असल्याचे वक्त्यांनी सांगितले.


या कार्यक्रमास थेरो दिंपकर, जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे हिशेब तपासणी प्रमुख नंदकुमार काळे, धम्मशील चॅरिटेबल ट्रस्टचे विलासराव कांबळे, गौतम माने, अर्जुन वीर, डॉ. आदिनाथ माळगे, पी. टी. कांबळे, रामचंद्र गायकवाड, शाहीर किरण जगतात, संतोष मोरे, तुकाराम गायकवाड यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


"जनतेच्या कल्याणासाठी आयुष्य वेचणाऱ्या आणि न्यायनिष्ठ राज्यकारभाराचा आदर्श निर्माण करणाऱ्या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे," असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या