मुंबई, दि. २ : महाकारुणी भगवान गौतम बुद्ध यांनी दिलेला बौद्ध धम्म हा संपूर्ण मानवजातीसाठी आदर्श जीवनमार्ग असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले.
घाटकोपर (पश्चिम) येथील भीमनगर परिसरातील धम्मरत्न बुद्धविहारात बुद्धमूर्ती तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना त्यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
आठवले म्हणाले की, भगवान बुद्धांनी मानवतेचा, विज्ञानवादी दृष्टिकोनाचा, अहिंसेचा, विश्वशांतीचा आणि विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. भारतात जन्मलेला बौद्ध धम्म आज संपूर्ण जगभर पोहोचला असून ही अभिमानाची बाब आहे.
या कार्यक्रमात जयभवानी विकास मंडळ व रिपब्लिकन पक्षाच्या वतीने ना. रामदास आठवले यांचा भव्य सत्कार करण्यात आला. सलग तिसऱ्यांदा राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांना पुष्पहार व पुतळा देऊन गौरविण्यात आले.
यावेळी माजी आमदार वीरेंद्र बक्षी, मुंबई प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब गरुड, सोहेल शेख, प्रकाश जाधव, हेमंत रणपिसे, देवेंद्र रणपिसे, मनोज रणपिसे, डॉ. निलेश बनसोडे, मनोज घोडेस्वार, सुमिता शिंदे, मयुर चाबुकस्वार, उमेश गायकवाड, हितेश जगताप, विजय वंजारी, अमीना खान, बौद्धाचार्य साहेबराव गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात डॉ. बळवंत सिंह लिखित “बुद्धमुद्रा” या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशनही ना. आठवले यांच्या हस्ते करण्यात आले.
आठवले यांनी पुढे सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान सर्व धर्म आणि जातींसाठी समान आहे. एकमेकांच्या धर्माचा सन्मान ठेवत सामाजिक ऐक्य वाढवणे आवश्यक आहे.
तसेच, रिपब्लिकन पक्ष देशभर बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
हेमंत रणपिसे, प्रसिद्धी प्रमुख यांनी प्रसिद्धीस दिले.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज