प्रतिनिधी:
कल्याण,दि.३१- : कल्याण शहरातून नातेसंबंधांना काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध जाऊन प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून एका वडिलांनी स्वतःच्या विवाहित मुलीची धारदार शस्त्राने हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली असून संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेतील पारनाका परिसरातील रचना रॉयल इमारतीत राहणाऱ्या विनोद वसईकर यांनी आपल्या मुलगी गायत्री वसईकर हिची हत्या केली. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. मात्र बाजारपेठ पोलिसांनी विशेष पथकाच्या मदतीने शोधमोहीम राबवत त्याला ताब्यात घेतले.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, गायत्रीने काही महिन्यांपूर्वी कुटुंबाच्या विरोधात जाऊन तिच्या प्रियकरासोबत प्रेमविवाह केला होता. या निर्णयामुळे वडील विनोद वसईकर प्रचंड नाराज होते. त्यांनी यापूर्वी मुलीसाठी अनेक स्थळे पाहिली होती आणि तिचा साखरपुडाही ठरवला होता. मात्र गायत्रीने तो साखरपुडा मोडून स्वतःच्या पसंतीने विवाह केल्याने वडिलांच्या मनात तिच्याविषयी तीव्र नाराजी निर्माण झाली होती.
लग्नानंतर गायत्री प्रथमच माहेरी आली होती. दुपारच्या जेवणानंतर घरात प्रेमविवाहाच्या मुद्द्यावरून वडील आणि मुलीमध्ये जोरदार वाद झाला. "माझे काहीही न ऐकता तू लग्न केलेस, मी ते विसरलो नाही," असे म्हणत विनोद वसईकर यांनी संतापाच्या भरात गायत्रीवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचे तपासात समोर आले आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या गायत्रीचा जागीच मृत्यू झाला.
हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला होता. मात्र बाजारपेठ पोलिसांनी तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे त्याचा माग काढत अखेर अटक केली. सध्या आरोपीची कसून चौकशी सुरू असून हत्येमागील सर्व पैलूंचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, या घटनेमुळे कल्याण शहरात हळहळ व्यक्त होत असून प्रेमविवाहाच्या वादातून एका तरुणीचा जीव गेल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपी विनोद वसईकर यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असून न्यायालयीन कोठडीची मागणी केली जाण्याची शक्यता आहे.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज