मुंबईत आंबेडकरी समाजाचा विराट एल्गार! अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधात अभूतपूर्व महामोर्चा; "संविधानावर घाला खपवून घेणार नाही"

'उपवर्गीकरण रद्द करा, अन्यथा देशव्यापी आंदोलन' – सरकारला थेट इशारा



मुंबई | प्रतिनिधी,दि.१- : अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या प्रस्तावित निर्णयाविरोधात आज मुंबईत आंबेडकरी समाजाचा विराट एल्गार पाहायला मिळाला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो नागरिक, विविध आंबेडकरी संघटना, सामाजिक कार्यकर्ते, युवक-युवती, महिला आणि संविधानप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. मुंबईच्या रस्त्यांवर निघालेल्या या महामोर्च्याने सरकारविरोधातील तीव्र जनभावना अधोरेखित केली.


मोर्चादरम्यान आंदोलकांनी उपवर्गीकरणाचा निर्णय हा अनुसूचित जातींमध्ये फूट पाडण्याचा आणि भारतीय संविधानाने दिलेल्या समान हक्कांवर आघात करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला. "संविधान वाचवा", "जय भीम", "उपवर्गीकरण रद्द करा", "सामाजिक न्यायाचा विजय असो" अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.


मोर्चामध्ये भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे सामूहिक वाचन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करत संविधान, आरक्षण आणि सामाजिक न्यायाच्या संरक्षणाची सामूहिक शपथही घेण्यात आली.


आंदोलकांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, अनुसूचित जातींना मिळालेले घटनात्मक अधिकार हे संघर्षातून आणि भारतीय संविधानामुळे प्राप्त झाले आहेत. त्यामुळे त्या अधिकारांमध्ये कोणताही हस्तक्षेप किंवा विभागणीचा प्रयत्न कदापि सहन केला जाणार नाही.


महामोर्चाच्या माध्यमातून सरकारला स्पष्ट इशारा देण्यात आला की, अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा. अन्यथा हा लढा मुंबईपुरता मर्यादित राहणार नसून महाराष्ट्रासह देशभर व्यापक जनआंदोलन उभारले जाईल.


मोर्चाचा समारोप संविधान, सामाजिक न्याय आणि समानतेच्या मूल्यांच्या संरक्षणाचा निर्धार व्यक्त करत करण्यात आला. उपस्थितांनी एकमुखाने घोषणा दिली की, "संविधानावर कुठलाही आघात सहन केला जाणार नाही; अनुसूचित जातींची एकजूट कायम राहील."

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या