दलित वस्तीचा निधी वळवला? फलटण नगर परिषद अडचणीत; भीम आर्मीचा आत्मदहनाचा इशारा

सहआयुक्तांचे अहवाल सादर करण्याचे आदेश




फलटण (प्रतिनिधी),दि.१८-:फलटण नगर परिषदेत दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत आलेल्या निधीच्या कथित गैरवापरामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे योजनेअंतर्गत सन 2023-24 मध्ये प्राप्त झालेला निधी दलित वस्तींऐवजी इतर ठिकाणी वळवण्यात आल्याचा गंभीर आरोप भीम आर्मी संघटनेने केला आहे.

या प्रकरणाची दखल घेत जिल्हा सहआयुक्तांनी फलटण नगर परिषदेला सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. भीम आर्मीच्या मते, ठराव क्र. 325 अंतर्गत मंजूर करण्यात आलेली कामे प्रत्यक्षात दलित वस्तींमध्ये न करता इतर भागात करण्यात आली. विशेष म्हणजे 50 टक्क्यांपेक्षा कमी दलित वस्ती असलेल्या भागांमध्ये निधी खर्च केल्याचा आरोपही संघटनेने केला आहे.

या कथित गैरप्रकारामुळे दलित समाजावर अन्याय झाला असून शासनाची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत भीम आर्मीने पुणे विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती.

दरम्यान, या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई न झाल्यास भीम आर्मी संघटना पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.

भीम आर्मीचे कार्यकर्ते अजित संभाजी मोरे यांनी सांगितले की, “भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी न घालता सत्य अहवाल सादर करावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी. हा प्रश्न केवळ एका वस्तीचा नसून सामाजिक न्यायाचा आहे.”

या प्रकरणामुळे फलटण शहरात राजकीय व सामाजिक वातावरण तापले असून, प्रशासनाचा पुढील निर्णय काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अजित संभाजी मोरे, सुनील पवार, तुषार जाधव, तेजस भोसले, सनी पवार, विजय कांबळे




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या