वाढदिवशीच ‘रील स्टार’चा खून! प्रेमसंबंधातून थरारक शेवट; कालव्यात सापडली कुजलेली बॉडी


पंढरपूर (सोलापूर) ,दि.१८-: सोशल मीडियावर रील व्हिडिओमुळे ओळख मिळवलेल्या ३४ वर्षीय सोनाली जाधव हिच्या खुनाने संपूर्ण परिसर हादरला आहे. वाढदिवसाच्या दिवशीच प्रियकराने तिचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे पंढरपूर तालुक्यात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

सोनाली जाधव ही पंढरपूर तालुक्यातील भोसे गावातील रहिवासी होती. विवाह झाल्यानंतर काही कौटुंबिक कारणांमुळे ती पतीपासून वेगळी होऊन माहेरी राहत होती. सोशल मीडियावर रील्स तयार करून ती फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध झाली होती.


भोसे गावात राहत असताना तिची ओळख तुकाराम उर्फ बुवा वामन गावांधरे या तरुणाशी झाली. सुरुवातीला मैत्री आणि नंतर प्रेमसंबंध जुळले. मात्र काही दिवसांतच या नात्यात संशयाची पाल चुकचुकू लागली. तुकारामला सोनालीच्या वागण्यावरून वारंवार संशय येत होता. त्यामुळे दोघांमध्ये सतत वाद होत होते.


वाढदिवसानिमित्त सोन्याचे दागिने देण्याचे आमिष दाखवत तुकारामने सोनालीला भेटायला बोलावले. बाईकवरून तिला निर्जन ठिकाणी नेल्यानंतर दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. संतापाच्या भरात तुकारामने तिचा गळा दाबून खून केल्याचा आरोप आहे.


खून केल्यानंतर गुन्हा लपवण्यासाठी आरोपीने सोनालीचा मृतदेह रोपळे परिसरातील उजनी कालव्यात फेकून दिला. दोन दिवस ती घरी न परतल्याने तिच्या वडिलांनी करकंब पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दिली.


तांत्रिक पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तुकारामला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. कालव्यातून कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाची ओळख कपडे आणि दागिन्यांवरून सोनालीची असल्याचे निश्चित झाले.


सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या सोनालीच्या अकाली मृत्यूने तिच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. वाढदिवशीच तिचा दुर्दैवी अंत झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या