बारामती ,दि.१७-: तालुक्यातील निरावागज गावातील रस्त्यांची अत्यंत खराब अवस्था आणि प्रशासनाची सातत्याने होत असलेली दुर्लक्ष यामुळे ग्रामस्थांचा संताप अनावर झाला आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही रस्त्यांची दुरुस्ती न झाल्याने अखेर ग्रामस्थांनी थेट बारामती विधानसभा पोटनिवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.
गावातील प्रमुख रस्ते पूर्णपणे खड्डेमय झाले असून पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य निर्माण होते. त्यामुळे शाळकरी मुले, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना दररोज मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रुग्णवाहिका व इतर आपत्कालीन सेवा वेळेत पोहोचू शकत नसल्याने नागरिकांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे.
ग्रामस्थांनी सांगितले की, संबंधित विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. केवळ आश्वासनांवर वेळ घालवला जात असून प्रत्यक्षात काम काहीच होत नाही, अशी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
याच पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी एकत्र येत आंदोलनाचा इशारा दिला असून, “जोपर्यंत रस्ते दुरुस्त होत नाहीत, तोपर्यंत मतदानावर बहिष्कार टाकू,” असा ठाम निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे प्रशासन आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज