फलटण: [प्रतिनिधी] दि.30 एप्रिल 2026,
सातारा जिल्ह्यात शिवसेनेचा (एकनाथ शिंदे गट) बालेकिल्ला अधिक मजबूत करण्यासाठी आणि पश्चिम महाराष्ट्रात पक्षाची पाळेमुळे खोलवर रुजवण्यासाठी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांना विधानपरिषदेवर संधी देऊन आमदार करावे, अशी आग्रही मागणी मंगळवार पेठेचे युवा नेते आणि बु. गणेश अहिवळे (मेंबर) प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. प्रशांत अहिवळे यांनी केली आहे.
शिंदे साहेबांची ताकद दुपटीने वाढणार!
प्रशांत अहिवळे यांनी म्हटले आहे की, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे एक सुसंस्कृत नेते आणि यशस्वी उद्योजक म्हणून संपूर्ण जिल्ह्यात परिचित आहेत. त्यांनी सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम करताना आपल्या प्रशासकीय कौशल्याची छाप पाडली आहे. त्यांना विधानपरिषदेवर संधी दिल्यास राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांची ताकद सातारा जिल्ह्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात दुपटीने वाढण्यास मदत होईल.
नाईक निंबाळकर घराण्याचे मोठे योगदान!
श्रीमंत संजीवराजे हे विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू आहेत. रामराजे नाईक निंबाळकर यांनी कृष्णा खोऱ्याचे भगीरथ म्हणून पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळ हटवण्यासाठी ऐतिहासिक कार्य केले आहे. याच अभ्यासू आणि उच्चशिक्षित घराण्याचा वारसा संजीवराजे यांच्या रूपाने शिवसेनेला मिळाल्यास आगामी काळात जिल्ह्याच्या राजकारणात मोठे सकारात्मक बदल पाहायला मिळतील.
भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाला चोख उत्तर;
"मागील काळात सातारा जिल्ह्यात भाजपने फोडाफोडीचे राजकारण करत जिल्हा परिषद आणि फलटण पंचायत समितीमध्ये सत्तांतर घडवून आणले. युतीचे बहुमत असतानाही लोकशाहीचा गळा आवळण्याचे काम झाले. या फोडाफोडीच्या राजकारणाला पायबंद घालण्यासाठी आणि शिवसैनिकांमध्ये नवा उत्साह संचारण्यासाठी संजीवराजे यांच्यासारख्या सक्षम नेतृत्वाची आज जिल्ह्याला गरज आहे," असेही प्रशांत अहिवळे यांनी नमूद केले.
शिवसेना पश्चिम महाराष्ट्रात झेप घेणार!
येणाऱ्या विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता, संजीवराजे नाईक निंबाळकर यांना विधानपरिषदेची उमेदवारी मिळाल्यास त्याचा मोठा फायदा सातारा जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेला होईल. त्यामुळे पक्ष नेतृत्वाने या मागणीचा सकारात्मक विचार करावा, अशी भावना प्रशांत अहिवळे यांनी व्यक्त केली आहे.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज