अनिल वीर
सातारा,दि.३०-:सातारा जिल्ह्यात गेल्या तीन ते चार महिन्यांपासून घरगुती गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. इंडियन, भारत आणि एचपी गॅस पुरवठा एजन्सींविरोधात तक्रारींचा पाऊस पडत असून, संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी होत आहे.
ग्राहकांच्या म्हणण्यानुसार, ऑनलाइन बुकिंग करूनही नियमानुसार घरपोच गॅस मिळत नाही. उलट ग्राहकांना एजन्सी कार्यालय, टोकन प्रक्रिया आणि गोडाऊन यामधून स्वतःच सिलेंडर आणावा लागत आहे. “घरपोच सेवा ही एजन्सीची जबाबदारी असताना ती पूर्ण केली जात नाही,” अशी नाराजी व्यक्त होत आहे.
याशिवाय, काही ठिकाणी घरगुती गॅसचा तुटवडा दाखवून तोच सिलेंडर हॉटेल व व्यावसायिकांना जादा दराने (ब्लॅकमध्ये) विकला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. अधिकृत किंमत सुमारे 930 रुपये असताना तोच सिलेंडर 3000 रुपयांपर्यंत विकला जात असल्याचेही सांगितले जात आहे.
ग्राहकांनी वारंवार तक्रारी करूनही एजन्सींकडून समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप आहे. “गॅस नाही, ड्रायव्हर नाही, माणसं नाहीत,” अशी कारणे देत ग्राहकांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचेही समोर आले आहे.
या पार्श्वभूमीवर, जनरल कामगार युनियनचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ मदाळे यांनी जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांना निवेदन देत तातडीने चौकशी करून गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. तसेच, दोषींवर कठोर कारवाई करून नियमानुसार व अधिकृत दरातच गॅस उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास एजन्सी च्या गाड्या अडवण्यात येतील तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज