वाई तालुक्यात जमिनीच्या वादातून भावजयीचा खून; दिर अटकेत

 



वाई ,‌दि.२९-:तालुक्यातील नागेवाडी येथे वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून भावजयीचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीती आणि खळबळ निर्माण झाली आहे.


मृत महिलेचे नाव गीताबाई चंद्रकांत यादव (वय ४२) असे असून संशयित आरोपी भिकू विठ्ठल यादव (वय ६०) हा त्यांचा दिर आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबातील तीन एकर वडिलोपार्जित जमिनीच्या विक्रीवरून काही दिवसांपासून वाद सुरू होता. आरोपी भिकू यादव जमीन विकण्याच्या भूमिकेत होता, तर गीताबाई यादव यांनी त्याला ठाम विरोध केला होता. “जिवंत असेपर्यंत जमीन विकू देणार नाही,” अशी त्यांची ठाम भूमिका होती.


घटनेच्या दिवशी सकाळी गीताबाई यांचे पती शेळ्या चारण्यासाठी बाहेर गेले होते. त्याच वेळी घरातून आरडाओरड ऐकू आल्याने ते आणि शेजारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. तेव्हा गीताबाई या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळल्या. आरोपी धारदार शस्त्राने वार करत असल्याचेही दिसून आले. नागरिकांना पाहताच आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.


घटनेची माहिती मिळताच वाई पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली. पाठलाग करून वाई–पाचगणी रस्त्यावरील १६ नंबर बसथांब्यावर सापळा रचून पोलिसांनी त्याला अटक केली.


मृतदेहाचा पंचनामा करून तो पुढील तपासासाठी वाई ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या