मदुरै (तामिळनाडू),दीड.७-:तामिळनाडूमधील बहुचर्चित सतनकुलम कोठडी मृत्यू प्रकरणात मदुरै न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देत ९ पोलिस कर्मचाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. २०२० मध्ये घडलेल्या या अमानुष घटनेने संपूर्ण देश हादरला होता.
थुथुकुडी जिल्ह्यातील सतनकुलम येथे मोबाईल दुकान चालवणारे 59 वर्षीय पी. जयराज आणि त्यांचा मुलगा जे. बेनिक्स यांना लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. दुकान उशिरापर्यंत सुरू ठेवल्याचा आरोप करत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
मात्र, कोठडीत दोघांवर अमानुष अत्याचार करण्यात आला. जबर मारहाणीमुळे त्यांची प्रकृती गंभीर झाली आणि काही दिवसांतच दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती.
या प्रकरणाचा तपास सखोल पद्धतीने करण्यात आला. वैद्यकीय अहवाल, साक्षीदारांचे जबाब आणि अन्य पुरावे यांच्या आधारे न्यायालयाने ९ पोलिसांना दोषी ठरवत कठोर शिक्षा सुनावली.
न्यायालयाने निरीक्षणात म्हटले की, “कायद्याचे रक्षकच जर भक्षक बनले, तर सामान्य नागरिकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास ढासळतो.” या गुन्ह्याला “दुर्मीळातील दुर्मीळ” प्रकारात मोडत फाशीची शिक्षा देण्यात आली.
या घटनेची तुलना अनेकांनी जय भीम या चित्रपटाशी केली असून, पोलीस अत्याचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
या निर्णयामुळे देशभरातून समाधान व्यक्त होत असून, भविष्यात अशा घटनांना आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज