वाई,दि.७- : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे नेते विराज शिंदे आणि जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण सभापती ऋतुजा शिंदे यांच्या विरोधात सोमवारी वाई येथे काढण्यात आलेल्या मोर्चात एक वेगळीच चर्चा रंगली. मोर्चात सर्वात पुढे उभा राहून जोरदार घोषणा देणारा कोरेगाव तालुक्यातील संतोष जाधव हा कार्यकर्ता सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.
वाईकर कार्यकर्त्यांच्या मोर्चात कोरेगावचा कार्यकर्ता इतक्या आक्रमकपणे घोषणा देताना दिसल्याने उपस्थितांमध्ये कुजबुज सुरू झाली. “हा कार्यकर्ता कोण?” आणि “याचा या आंदोलनाशी नेमका काय संबंध?” अशा चर्चा रंगू लागल्या. अनेक वाईकर कार्यकर्ते त्याच्या घोषणा देण्याच्या शैलीकडे आश्चर्याने पाहताना दिसत होते.
दरम्यान, विराज शिंदे यांनी काँग्रेसमधील युवक जिल्हाध्यक्ष पदावरून राष्ट्रवादी (अजित पवार गट)मध्ये प्रवेश करताच स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. मंत्री मकरंद पाटील (मकरंब आबा) यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला होता. त्यानंतर त्यांच्या पत्नी ऋतुजा शिंदे यांना बावधन गटातून उमेदवारी देण्यात आली आणि त्यांनी निवडणुकीत विजय मिळवत सभापतीपदापर्यंत मजल मारली.
ऋतुजा शिंदे यांच्या सभापतीपदाच्या निवडीवेळीही त्यांचे नाव अचानक चर्चेत आले होते. सुरुवातीला फारसे लक्ष न गेलेले हे नाव निवडीच्या क्षणी पुढे आले आणि त्या सभापतीपदी विराजमान झाल्या.
याच पार्श्वभूमीवर त्यांच्या निषेधार्थ वाईमध्ये मोर्चा काढण्याची घोषणा प्रमोद शिंदे यांनी केली होती. मोर्चासाठी वाई शहरातील चौकात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमले, मात्र या गर्दीत कोरेगावच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती विशेष ठरली.
विशेष म्हणजे, स्थानिकांपेक्षा बाहेरून आलेल्या या कार्यकर्त्यानेच मोर्चात ‘मार्केट मारल्याची’ चर्चा रंगली. “वाईच्या मोर्चात कोरेगावकर भारी पडला,” अशी मिश्कील प्रतिक्रिया अनेकांनी दिली.
एकंदर, राजकीय निषेधाच्या मोर्चात ‘बाहेरचा आवाज’ जास्त घुमल्याने वाईतील राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज