सांगली | प्रतिनिधी (दि. २८)
“दलित आणि सवर्ण समाजाला जोडून सामाजिक ऐक्य उभारणे हेच आपले प्रमुख उद्दिष्ट आहे,” असे स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी सांगलीत केले. तिसऱ्यांदा राज्यसभेवर निवडून आल्याबद्दल त्यांचा येथील विष्णुदास भावे न्यायमंदिर येथे नागरी सत्कार करण्यात आला.
आपल्या भाषणात आठवले म्हणाले, “मी सांगलीचा आहे. माझ्या चळवळीची सुरुवातही इथूनच झाली. सांगलीने मला कायम प्रेम दिले. या ऋणाची परतफेड करण्यासाठी मंत्रीपदाचा लाभ सांगलीला देण्याचा प्रयत्न करेन.” भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी आपल्या खास शैलीतील चारोळ्यांनी उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री विठ्ठल ददा पाटील यांच्या सहवासाचा उल्लेख करत सांगितले की, “त्यांनी मला प्रेरणा दिली आणि दलित–मराठा समाज एकत्र आणण्यासाठी ताकद दिली. त्यातूनच माझी चळवळ गावोगावी पोहोचली.”
कार्यक्रमाला खासदार विशाल पाटील, आमदार इद्रिस नायकवडी, आमदार दिलीप सोपल, जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता पाटील यांसह विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
खासदार विशाल पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा उल्लेख करत म्हटले की, “आठवले यांनी बाबासाहेबांचे विचार राज्यभरच नव्हे तर देशभर पोहोचवले. त्यामुळेच ते वंचितांचे मंत्री म्हणून ओळखले जातात.”
आमदार इद्रिस नायकवडी यांनीही आपल्या खास शैलीत भाष्य करत “मी आमदार झालो तरी मित्रांसाठी तसाच आहे,” असे सांगत उपस्थितांमध्ये हशा पिकवला.
कार्यक्रमाचे संयोजन राजर्षी शाहू शिक्षण संस्थेचे संस्थापक विठ्ठल पाटील यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी वारकरी परिषदेची माहिती देत आठवले यांच्याशी असलेल्या मैत्रीचा उल्लेख केला. शेवटी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी आभार मानले.
हेमंत रणपिसे, प्रसिद्धी प्रमुख यांनी प्रसिद्धीस दिले.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज