नाशिक, दि.२२: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, भारत सरकार मा. श्री. रामदास आठवले साहेब नाशिक दौऱ्यावर आले असता, उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीच्या वतीने शासकीय विश्रामगृह, नाशिक येथे त्यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन समितीचे मुख्य निमंत्रक महाराष्ट्ररत्न अनिलभाई गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
या निवेदनात महाराष्ट्र शासनाकडून प्रस्तावित उपवर्गीकरणास तीव्र विरोध नोंदविण्यात आला. महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जातीने दुसऱ्या जातीचे आरक्षण घेतलेले नाही, त्यामुळे उपवर्गीकरणाची कोणतीही आवश्यकता नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
तसेच महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा महाराष्ट्र असून येथे सर्व समाज गुण्यागोविंदाने नांदत आहेत. समाजामध्ये तेढ निर्माण होईल असा कोणताही निर्णय शासनाने घेऊ नये, तसेच उपवर्गीकरणाचा अहवाल गुंडाळून ठेवावा, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी समितीचे प्रवक्ते प्रतिक पगारे, ज्येष्ठ नेते कैलासजी तेलोरे, ज्येष्ठ नेते एकनाथ मोरे, युवा नेते राहुल जगताप, सुशीलकुमार गायकवाड, दिलीप दूनबळे, युवा नेते प्रशांत गांगुर्डे आदी उपस्थित होते.


0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज