सांगली,दि.८- : शहरातील वर्दळीच्या राम मंदिर चौकात शनिवारी पहाटे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा विनापरवाना उभारण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिस आणि महापालिका प्रशासनाने तत्परता व सामंजस्याची भूमिका घेतल्याने संभाव्य अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे साडेचारच्या सुमारास शिवतेज सावंत, आदित्य नाईक, आशिष खिचडे, अमित पाटील, सुजल कांबळे, राहुल माने, ऋषिकेश भोई यांच्यासह सुमारे 60 ते 70 तरुणांच्या गटाने राम मंदिर चौकात एकत्र येत पुतळा उभारला. पहाटे गस्त घालणाऱ्या ‘गुड मॉर्निंग’ पथकाच्या निदर्शनास ही बाब येताच प्रशासनाला तातडीने माहिती देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिस ठाण्याचे उपअधीक्षक संदीप भागवत व पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. विनापरवाना पुतळा उभारल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन सांगली शहर पोलिस ठाणे तसेच दंगल नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले.
घटनेचे गांभीर्य ओळखून महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे हेही घटनास्थळी दाखल झाले. यावेळी कार्यकर्ते आणि प्रशासन यांच्यात काही काळ जोरदार चर्चा झाली. सुरुवातीला तणाव निर्माण झाला असला तरी प्रशासनाने संयम राखत कार्यकर्त्यांना नियमांची जाणीव करून दिली आणि चर्चेतून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.
अखेर सकारात्मक चर्चेनंतर कार्यकर्त्यांनी समन्वयाची भूमिका घेत स्वतःहून पुतळा हटवण्यास सहमती दर्शवली. सकाळी संबंधितांनी पुतळा त्या ठिकाणाहून बाजूला घेतला. पोलिसांनी पुतळा सन्मानपूर्वक ताब्यात घेतल्याने परिसरातील वातावरण शांत झाले.
दरम्यान, या घटनेमुळे शहरात विनापरवाना बांधकामे व पुतळे उभारण्याच्या प्रकारांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासनाने यावर कठोर भूमिका घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज