अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून एजन्सी बंद करण्याची मागणी; आजपासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू!
फलटण (प्रतिनिधी) :दि.08 एप्रिल 2024,
येथील विक्रम गॅस एजन्सीचे मालक श्री. निकम यांचे चिरंजीव डॉ. निकम यांनी एका सरकारी अधिकार्यासमोर बौद्ध समाजाबद्दल अत्यंत आक्षेपार्ह आणि जातीय द्वेष पसरवणारे विधान केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाने संपूर्ण फलटण शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधित व्यक्तीवर तात्काळ 'अॅट्रॉसिटी' अंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करावा, या मागणीसाठी आजपासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १२ च्या सुमारास लक्ष्मी नगर येथील विक्रम गॅस एजन्सीचे कार्यालय बंद होते. यावेळी गॅस वितरणात होणाऱ्या अडचणींबाबत विचारणा करण्यासाठी नागरिक आणि पत्रकार तेथे उपस्थित होते. नायब तहसीलदार श्री. सोनवणे यांच्या सूचनेवरून पुरवठा विभागाचे अधिकारी नितीन कांबळे हे घटनास्थळी आले असता, नागरिकांनी आपल्या समस्या त्यांच्यापुढे मांडण्यास सुरुवात केली.
यावेळी विक्रम गॅस एजन्सीचे डॉ. निकम यांनी जबाबदार सरकारी अधिकारी कांबळे यांच्यासमोर विधान केले की, "मंगळवार पेठेतील लोक आमच्या विक्रम एजन्सीची गाडी अडवून गॅस सिलेंडर ओढतात." मंगळवार पेठ हा प्रामुख्याने बौद्ध समाज बांधवांचा भाग असल्याचे माहित असूनही, जाणीवपूर्वक सार्वजनिक ठिकाणी समाजाची प्रतिमा मलीन करण्याच्या उद्देशाने हे विधान केल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.
प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष;
या बेजबाबदार विधानामुळे जातीय सलोखा बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 'राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष' सातारा जिल्हा अध्यक्ष श्री. पांडुरंग समुद्रलाल अहिवळे यांनी यासंदर्भात तहसीलदारांना निवेदन दिले असून, डॉ. निकम यांच्यावर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा १९८९ मधील कलम ३(१)(R)(S) नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
आजपासून आमरण उपोषण;
प्रशासनाने वेळेत दखल न घेतल्याने, दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे आज बुधवार, ८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजेपासून तहसील/उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. या घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग पुरावा म्हणून उपलब्ध असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी कामगार संघर्ष संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री.महादेव गायकवाड (आप्पा), भीम आर्मी तालुका अध्यक्ष श्री.अजित मोरे,तालुका उपाध्यक्ष श्री.सुनील पवार, सामाजिक कार्यकर्ते श्री .विजय भोंडवे उपस्थित होते
आता या प्रकरणी फलटण प्रशासन आणि पोलीस विभाग काय कठोर कारवाई करणार? की जातीय द्वेष पसरवणाऱ्यांना पाठीशी घालणार? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज