बारामतीत राजकीय रणधुमाळी; पार्थ पवारांचा काँग्रेसला सज्जड दम


बारामती,दि.७-:बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, पार्थ पवार यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला थेट आणि आक्रमक इशारा दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.


ही पोटनिवडणूक बिनविरोध पार पडेल, अशी अपेक्षा व्यक्त होत असतानाच काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर करत रिंगणात उतरवल्याने निवडणुकीला नवे वळण मिळाले आहे. या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया देताना पार्थ पवार यांनी “बारामतीच्या भावना लक्षात घ्या, अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल,” असा स्पष्ट इशारा दिला आहे.


पार्थ पवार यांनी बारामती ही केवळ मतदारसंघ नसून विकास आणि जनतेच्या विश्वासाचे प्रतीक असल्याचे नमूद केले. दिवंगत अजित पवार यांच्या कार्यामुळे येथे भावनिक नाते निर्माण झाले असून, अशा परिस्थितीत बिनविरोध निवडणूक होणे अपेक्षित होते, असे त्यांनी सांगितले.


दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताच महायुतीची ताकद एकवटल्याचे चित्र पाहायला मिळाले. या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे , सुनील तटकरे, प्रफुल पटेल धनंजय मुंडे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.


काँग्रेसच्या निर्णयामुळे महाविकास आघाडीतील मतभेद आता उघड झाले असून, बारामतीत थेट अटीतटीची लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, पार्थ पवार यांच्या आक्रमक भूमिकेमुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची लढाई बनली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या