मुंबई | प्रतिनिधी
दि.११/०४/२०२६
महिलांचे लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणूक प्रकरणातील आरोपी भोंदू अशोक खरात विरोधातील तपास सुरू असतानाच या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एस आय टी कडे बीड जिल्ह्यातील एका व्यक्तीने धक्कादायक तक्रार दाखल केली असून, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीने ही तक्रार लेखी स्वरूपात सादर केली असून त्यामध्ये संभाव्य धोक्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र या आरोपांमध्ये किती तथ्य आहे, याची सखोल पडताळणी आता एसआयटीमार्फत केली जाणार आहे. या तक्रारीनंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असून विविध स्तरांवर चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत सखोल चौकशीची मागणी केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करताना त्यांनी काही संशयास्पद बाबींचा उल्लेख केला आहे. त्यात काळी जादूचे कथित प्रकार, विमान अपघाताशी जोडलेले दावे, तसेच आरोपी खरात याच्याकडे आढळलेल्या काही वस्तूंचा संदर्भ देत या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.
या प्रकरणात रुपाली चाकणकर यांचे नाव यापूर्वीही चर्चेत आले होते. अशोक खरात यांच्याशी त्यांचे संबंध असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. तसेच खरात यांच्या ट्रस्टवर त्या ट्रस्टी असल्याची माहितीही पुढे आली होती. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही फोटो आणि व्हिडिओंमुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.
या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर पक्षातील महिला अध्यक्षपदही त्यांच्याकडून काढून घेण्यात आले. विशेष म्हणजे, त्यांच्या राजीनाम्यासाठी सुनेत्रा पवार या आग्रही असल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती.
सध्या एसआयटी मार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, पीडित महिलांसाठी हेल्पलाईन आणि इतर माध्यमे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. दररोज मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत असून, त्यामध्ये आर्थिक फसवणूक, लैंगिक शोषणासोबतच कौटुंबिक वादांशी संबंधित प्रकरणांचाही समावेश आहे. त्यामुळे या सर्व तक्रारींची सत्यता पडताळणे हे तपास यंत्रणेसमोर मोठे आव्हान ठरत आहे.
आतापर्यंत या प्रकरणात सुमारे १५ गुन्हे दाखल झाले असून, स्वतःचे भविष्य सांगणारा भोंदू अशोक खरात याचेच भवितव्य आता अंधारात गेल्याची चर्चा सुरू आहे.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज