सांगली | प्रतिनिधी | दि. ३० एप्रिल २०२६
छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे कथित विकृतीकरण तसेच महिलांविषयी करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांच्या निषेधार्थ सांगलीत गुरुवारी तीव्र आंदोलन करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली विविध संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत प्रशासनाकडे कडक कारवाईची मागणी केली.
आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी कॉ. गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” या पुस्तकाचे जाहीर वाचन केले. इतिहासाबाबत योग्य माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पुस्तकाचे मोफत वाटपही करण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी पुस्तकाच्या संदर्भात वापरलेल्या कथित आक्षेपार्ह भाषेचा निषेध करण्यात आला. तसेच बागेश्वर बाबा उर्फ धर्मेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या वक्तव्यांमुळे समाजात तेढ निर्माण होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
आंदोलनकर्त्यांनी पुढील मागण्या केल्या:
आमदार संजय गायकवाड यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा
बागेश्वर बाबा उर्फ धर्मेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर इतिहास विकृतीकरणाबाबत कारवाई करावी
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात
या मागण्यांचे लेखी निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
आंदोलनावेळी पदाधिकाऱ्यांनी सरकारवर टीका करत महिलांच्या सन्मानाबाबत दुहेरी भूमिका घेतल्याचा आरोप केला. तात्काळ कारवाई न झाल्यास राज्यभर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
या आंदोलनात विनायक मोरे, मोहन साबळे, मधुकर शेस्वरे, सचिन कोलप, प्रशांत वाघमारे, संजय कांबळे, ऋषिकेश माने, रोहित कांबळे, हिरामण भगत, अशोक नाईक, संदीप कांबळे, विशाल कोठावळे, दिनेश साबळे, रोहित भगत, सचिन कांबळे, विजय सुतार यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.




0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज