सांगली महापालिकेत पदोन्नतीत गोंधळ; वशिलेबाजीमुळे पात्र कर्मचाऱ्यांवर अन्याय – अमन समाज पार्टीचा आरोप


सांगली, प्रतिनिधी ,दि.६-: सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये कर्मचारी पदोन्नती व बदली प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता सुरू असल्याचा गंभीर आरोप अमन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आला आहे. या संदर्भात पक्षाचे राज्य अध्यक्ष मा. मिलिंद विष्णू साबळे यांनी मा. प्रधान सचिव, महाराष्ट्र राज्य तसेच महापालिका आयुक्तांकडे लेखी निवेदन सादर करून तातडीने चौकशीची मागणी केली आहे.


निवेदनात नमूद केल्यानुसार, महापालिकेतील काही विभागांमध्ये पदोन्नती व बदली या शासकीय नियमांनुसार न होता अधिकारी वर्गाच्या आवडीनिवडी व वशिलेबाजीच्या आधारे होत असल्याचे दिसून येत आहे. पात्र कर्मचाऱ्यांना डावलून अपात्रांना महत्त्वाच्या ठिकाणी नेमणूक दिली जात असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.


आस्थापना विभाग, मालमत्ता विभाग आणि आयुक्त कार्यालयामध्ये अनेक कर्मचारी दहा-दहा वर्षे एकाच ठिकाणी कार्यरत असल्याचेही निदर्शनास आले आहे. शासनाच्या नियमानुसार ३ ते ५ वर्षांनंतर बदली किंवा पदोन्नती अपेक्षित असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने भ्रष्टाचाराला खतपाणी मिळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


विशेषतः आयुक्त कार्यालयातील दिनेश जाधव हे गेल्या दहा वर्षांपासून पीए पदावर कार्यरत असून, त्यांची बदली का होत नाही, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.


दरम्यान, महापालिकेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अन्याय होत असूनही अनेक कर्मचारी उघडपणे तक्रार करण्यास घाबरत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदोन्नती देण्याऐवजी राजकीय दबावाखाली निर्णय घेतले जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.


अमन समाज पार्टीने या सर्व प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करून, पाच वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांची बदली करावी, तसेच पात्र कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.


या गंभीर आरोपांमुळे सांगली महापालिकेतील कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या