३५ गुन्ह्यांतील कुख्यात गुन्हेगार जाळ्यात; पुणे ग्रामीण पोलिसांनी उघड केले तीन खुनांचे थरारक गूढ




पुणे, (प्रतिनिधी )दि.१०-: पुणे ग्रामीण पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत ३५ गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या सराईत गुन्हेगाराला त्याच्या साथीदारासह अटक केली असून या कारवाईत पुणे ग्रामीण हद्दीतील दोन आणि ठाणे शहरातील एक अशा एकूण तीन खुनांचे गूढ उघडकीस आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि खेड पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने ही मोठी कामगिरी बजावली.


दि. १८ मार्च २०२६ रोजी खेड तालुक्यातील जैदवाडी परिसरात धनंजय मारुती घेवडे (वय ३३) यांचा मृतदेह आढळून आला होता. डोक्यावर व तोंडावर गंभीर मारहाण करून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.


घटनास्थळी सीसीटीव्ही नसल्यामुळे तपासात अडचणी निर्माण झाल्या. मात्र पोलिसांनी जवळपास ११० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा तपास करत ४५ किमीपर्यंत आरोपींचा मागोवा घेतला. अखेर वडगाव निंबाळकर परिसरात सापळा रचून आरोपींना पकडण्यात यश आले. उसाच्या शेतातून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच पोलिसांनी शिताफीने दोघांना जेरबंद केले.

अटक आरोपी ललित दिपक खोल्लम (वय ३८) – ३५ गुन्ह्यांचा इतिहास नंदलाल दिलीप होले (वय ३१)चौकशीत आरोपींनी धनंजय घेवडे याचा लोखंडी रॉड व दगडाने खून केल्याची कबुली दिली. तसेच या कटासाठी निलेश कैलास सणस याने आर्थिक मदत केल्याचे समोर आले असून त्यालाही अटक करण्यात आली आहे.

खुनांची मालिका उघड तपासादरम्यान आरोपी ललित खोल्लमने आणखी दोन खुनांची कबुली दिली.

श्रीकांत वाडेकर (वय २६) याचे अपहरण करून खून, मृतदेह जाळून पुरावे नष्ट करुन त्यानंतर त्याची आई रूपाली वाडेकर (वय ४६) हिचाही निर्दयी खून या दोन्ही घटना २०२५ मध्ये घडल्या असून त्या प्रकरणांनाही आता उकल मिळाली आहे. त्यांच्या जवळील खूनासाठी वापरलेले लोखंडी रॉड व दगड जाळलेल्या कपड्यांची राख विहिरीत फेकलेला मोबाईल

दोन गावठी पिस्तुले व चार काडतुसे पुरावे जप्त करण्यात आले.

गुन्हेगारी पार्श्वभूमी मुख्य आरोपी ललित खोल्लम याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी असे एकूण ३५ गुन्हे दाखल असून तो यापूर्वी मोक्का अंतर्गत कारवाईतही अडकला होता.

पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व खेड पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करत हा गुन्हा उघड केला. सध्या आरोपींना न्यायालयाने १३ एप्रिल २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे.

सलग तीन खुनांचे रहस्य उघड करून पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठा गुन्हेगारी जाळा उद्ध्वस्त केला असून या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या