फलटण (प्रतिनिधी): दि.10 एप्रिल 2026
एकीकडे महिला सुरक्षेच्या गप्पा मारल्या जात असताना, दुसरीकडे सरकारी रुग्णालयातच महिला सुरक्षित नसल्याची संतापजनक घटना फलटणमध्ये समोर आली आहे. फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका १८ वर्षीय नर्सिंग प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे शासकीय रुग्णालयातील महिलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.या प्रकारामुळे शासकीय रुग्णालयातील महिलांच्या सुरक्षेचे धिंडवडे निघाले असून आरोग्य प्रशासनाचे कंत्राटी कर्मचाऱ्यांवरील नियंत्रण सुटल्याचे चित्र दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी नर्सिंगचे शिक्षण घेत असून उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे इंटरनशिपसाठी येते. प्रकृती बिघडल्याने तिला याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. ९ एप्रिल २०२६ रोजी रात्री ९:०० च्या सुमारास, पीडितेची आई डबा आणण्यासाठी बाहेर गेली असता, तिथेच सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेला आरोपी अभिषेक अशोक सोडमिसे (रा. सोमंथळी, ता. फलटण) हा पीडितेच्या वॉर्डमध्ये शिरला.
आरोपीने ती एकटी असल्याचे पाहून तिच्या बेडवर बसून अश्लील संवाद साधण्यास सुरुवात केली. पीडितेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, त्याने तिचा विनयभंग करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. पीडितेच्या तक्रारीनंतर फलटण शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ७४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण फलटण शहरात संतापाची लाट उसळली आहे., अशा विकृत मानसिकतेच्या कंत्राटे कर्मचाऱ्याला तात्काळ सेवेतून काढून टाकण्यात यावे व त्याला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी महिला संघटनांकडून केली जात आहे.
'रक्षकच बनला भक्षक' – प्रशासनाचे मोठे अपयश!
या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आरोपी अभिषेक सोडमिसे हा त्याच रुग्णालयात कंत्राटी सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहे. ज्याच्यावर रात्रीच्या वेळी रुग्णालयातील महिला आणि रुग्णांच्या संरक्षणाची जबाबदारी होती, तोच वॉर्डमध्ये शिरून अत्याचार करत असेल, तर सामान्य जनतेने कुणावर विश्वास ठेवायचा? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.
सुरक्षा ऑडिट: उपजिल्हा रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेरे आणि रात्रीची सुरक्षा गस्त नावापुरतीच आहे का?
आता तरी उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाला जाग येईल का?
उपजिल्हा रुग्णालयात घडलेला हा प्रकार केवळ एक विनयभंग नसून सरकारी व्यवस्थेवरचा मोठा कलंक आहे. जर रुग्णालयात काम करणाऱ्या आणि उपचार घेणाऱ्या महिलाच तिथे सुरक्षित नसतील, तर सर्वसामान्यांनी आरोग्य व्यवस्थेकडून काय अपेक्षा ठेवायची? या प्रकरणातील आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावीच, पण त्याला कामावर ठेवणाऱ्या कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करण्यात यावे आणि संबंधित ड्युटी वर असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवरही जबाबदारी निश्चित होणे गरजेचे आहे.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज