बारामती, प्रतिनिधी , दि.८-:
बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला मोठा राजकीय आधार मिळाला असून, वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे या निवडणुकीत नव्या राजकीय समीकरणांची नांदी झाल्याचे मानले जात आहे.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने या जागेसाठी स्वतःचा उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसला निवडणूक लढवण्याचा पूर्ण संविधानिक अधिकार असल्याचे मतही आघाडीने व्यक्त केले आहे.
पक्षाचे मुख्य प्रवक्ते व राज्य उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी सांगितले की, काँग्रेस बारामतीत पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार असल्याची चर्चा असून, हा सकारात्मक घडामोडींचा भाग आहे.
दरम्यान, काँग्रेसकडून प्रचारासाठी राहुल गांधी यांना बारामतीत आणण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. यावर प्रतिक्रिया देताना मोकळे यांनी स्पष्ट केले की, जर राहुल गांधी बारामतीत प्रचारासाठी आले, तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रकाश आंबेडकर स्वतः प्रचारात सहभागी होतील.
या संदर्भात आघाडीच्या राज्य कार्यकारिणीत निर्णय झाल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे बारामतीतील पोटनिवडणूक अधिक रंगतदार होण्याची शक्यता असून, प्रमुख नेत्यांच्या सभांमुळे राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज