फलटण,दि.०१ – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार पेठ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण परिसर “जय भीम”च्या घोषणांनी दुमदुमून गेला असून, कार्यक्रमाला बुद्धमय वातावरण लाभले होते.
या शिबिराचे अध्यक्षस्थान नगरसेवक मा. सचिन सर अहिवळे व मा.नगरसेवक सनीदादा अहिवळे यांनी भूषविले. तसेच भीम जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष हरिष काकडे आणि नगरसेविका सौ. सुपर्णाताई अहिवळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उद्घाटक म्हणून डॉ. प्रसाद जोशी (ऑर्थोपेडिक सर्जन) उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून सिद्धांत अजित अहिवळे, अजय आनंद अहिवळे आणि सुरज यशवंत अहिवळे यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली. “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या संदेशाला प्रतिसाद देत अनेक युवक-युवती मोठ्या उत्साहात रक्तदानासाठी पुढे येत होते. यावेळी असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थितीही लक्षणीय होती.
शिबिरात सहभागी झालेल्या प्रत्येक रक्तदात्याला आयोजकांच्या वतीने आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
या उपक्रमामुळे गरजू रुग्णांना मोठा आधार मिळणार असून, भीम जयंतीचा उत्सव सामाजिक बांधिलकी जपणारा ठरला आहे. बाबासाहेबांच्या “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” या विचारांना उजाळा देत फलटणकरांनी समाजसेवेची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे.



0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज