बारामती, दि. १६:— (प्रतिनिधी): शहराच्या बाहेरील वंजारवाडी परिसरातील अमृता लॉजवर पोलिसांनी पहाटेच्या सुमारास टाकलेल्या धाडीत देहव्यवसायाचे रॅकेट उघडकीस आले आहे. गुप्त माहितीच्या आधारे बोगस ग्राहकाच्या मदतीने सापळा रचत ही कारवाई करण्यात आली.
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव व उपनिरीक्षक राम हरी भोसले यांच्या पथकाने मंगळवारी पहाटे सुमारे ३ वाजता पंचांसह लॉजवर अचानक छापा टाकला. यावेळी लॉजमधील विविध खोल्यांमध्ये संशयास्पद हालचाली आढळून आल्या. तपासात आरोपी बाहेरून महिलांना आणून ग्राहकांना पुरवत असल्याचे स्पष्ट झाले.
कारवाईदरम्यान पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून पाच महिलांची सुटका करण्यात आली आहे. आरोपींकडून रोख रक्कम, मोबाईल फोन तसेच ग्राहकांची नोंद असलेली वही जप्त करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यांची नावे अजित जयसीन शेट्टी (वय ३८) व चाँद कलाम आलम (वय २०) अशी आहेत.
सुटका करण्यात आलेल्या महिलांमध्ये पश्चिम बंगालमधील तीन तर भिवंडी येथील दोन महिलांचा समावेश असून त्यांना सुधारगृहात हलविण्यात आले आहे. आरोपींनी पैशांचे आमिष दाखवून महिलांकडून देहव्यवसाय करून घेतल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेमुळे बारामती परिसरात खळबळ उडाली आहे.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज