नाशिक | प्रतिनिधी
दिनांक ५/०४/२०२६
नाशिक शहरात उघडकीस आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने आता अत्यंत गंभीर आणि धक्कादायक वळण घेतले असून, या प्रकरणामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. महिलांची फसवणूक करून त्यांचे मानसिक, आर्थिक आणि लैंगिक शोषण करणाऱ्या या आरोपीने आता त्यांच्या आयुष्याशीच खेळ केल्याचे समोर आले आहे.
पोलीस तपासात उघड झाले आहे की, आरोपी अशोक खरात याने अनेक महिलांच्या नावावर बँक खाती उघडून त्यामध्ये स्वतःला नॉमिनी म्हणून नोंदवले होते. या खात्यांमधून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याचेही निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, या प्रकरणाला आणखी गंभीर बनवणारी बाब म्हणजे, आरोपीच्या केबिनमधील काही अत्यंत आक्षेपार्ह व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. या व्हिडीओंमध्ये आरोपी महिलांसोबत गैरवर्तन करताना स्पष्टपणे दिसत असून, अनेक पीडित महिलांचे चेहरेही उघडपणे दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्या ओळखी समाजासमोर येत असून, त्यांना मोठ्या मानसिक तणावाला सामोरे जावे लागत आहे.
या घटनेमुळे आधीच अन्याय सहन केलेल्या महिलांना आता आणखी मोठा मानसिक धक्का बसला आहे. ओळख उघड झाल्यामुळे नैराश्य आणि भीतीच्या छायेत सापडलेल्या तब्बल ८ ते ९ महिलांनी मानसोपचार तज्ज्ञांकडे धाव घेत उपचार सुरू केले आहेत.
या प्रकरणाच्या तपासासाठी नियुक्त विशेष तपास पथक (SIT) सध्या अत्यंत संवेदनशीलतेने चौकशी करत असून, पीडित महिलांना मानसिक आधार देण्याचे कामही सुरू आहे. महिलांची ओळख सुरक्षित राहावी यासाठी पोलीस गुप्त ठिकाणी चौकशी करत आहेत.
दरम्यान, नाशिक पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेत, अशा आक्षेपार्ह व्हिडीओंचा प्रसार करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे. सायबर पोलीस पथक सोशल मीडियावर लक्ष ठेवून असून, व्हिडीओ शेअर करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
नागरिकांनी अशा प्रकारचे व्हिडीओ पुढे पाठवू नयेत, अन्यथा कठोर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज