नांदेड | प्रतिनिधी,दि.२८- :
अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या मुद्द्यावरून राज्यासह देशभरात चर्चा रंगत असताना, या विषयावर समाजात निर्माण होत असलेल्या गैरसमजांवर भाष्य करताना अजिंक्य चांदणे यांनी ठाम भूमिका मांडली. “वर्गीकरणाच्या नावाखाली सरसकट मांग समाजाला टार्गेट करणे चुकीचे असून हे तात्काळ थांबवले पाहिजे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
नांदेड येथे शहीद पोचीराम कांबळे बचत गटाच्या वतीने आयोजित फुले-आंबेडकर व्याख्यानमालेत ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी त्यांनी आरक्षण वर्गीकरणाचा मुद्दा हा एखाद्या समाजाने उभा केलेला नसून तो केंद्र आणि राज्य सरकारांच्या धोरणांचा भाग असल्याचे सांगितले.
चांदणे म्हणाले की, अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे वर्गीकरण हा देशव्यापी फॉर्म्युला असून तो धोरणकर्त्यांनी तयार केला आहे. हा विषय न्यायालयीन प्रक्रियेद्वारे पुढे नेण्यात आला असून देशातील अनेक राज्यांमध्ये त्याची अंमलबजावणी झाली आहे. त्यामुळे “मांग समाजानेच हा मुद्दा निर्माण केला” ही धारणा पूर्णपणे चुकीची असल्याचे त्यांनी नमूद केले.
तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, हरियाणा आणि पंजाब या राज्यांमध्ये आरक्षणाचे वर्गीकरण लागू झाले असले तरी त्या ठिकाणी संबंधित समाजाने अशी मागणी केली नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले. “हा निर्णय सरकारचा आहे, त्यामुळे समाजाने आपसात वाद न घालता सरकारला प्रश्न विचारले पाहिजेत,” असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी त्यांनी समाजातील अंतर्गत तणावावरही चिंता व्यक्त केली. “महापुरुषांच्या विचारांचा अवमान करून, एकमेकांवर आरोप करत बसणे योग्य नाही. फुले-आंबेडकरी चळवळीने दिलेल्या समतेच्या मार्गावर राहून एकजूट ठेवणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.
तसेच, सरकारच्या भूमिकेला पाठिंबा देणाऱ्या नेत्यांनाही त्यांनी थेट प्रश्न विचारण्याचे आवाहन केले. “धोरणांची माहिती असलेल्या नेतृत्वाला जबाबदार धरणे गरजेचे आहे. समाजाने चुकीच्या दिशेने राग व्यक्त करण्याऐवजी योग्य ठिकाणी आवाज उठवावा,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज